स्वत:चा जीव धोक्यात घालून सैन्यदल, पोलीस, निमलष्करी दल या सेवांमध्ये कर्तव्य बजावावे लागते. सनदी सेवेचे तसे नसते. पण स्वत:ची प्रकृती चांगली नसतानाही रुग्णांना प्राणवायू मिळावा म्हणून अगदी श्वास घेण्यास त्रास होईपर्यंत झगडणारे केंद्रीय उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाचे सचिव गुरुप्रसाद महापात्र हे सनदी अधिकारी. गेले दोन महिने करोनाशी त्यांची सुरू असलेली झुंज अखेर संपली. वयाच्या ५९व्या वर्षी या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. करोनाने केंद्र व राज्यांमधील मंत्री, राजकारणी, निवृत्त सनदी व पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला; पण केंद्रातील सचिव पातळीवरील मृत्यू झालेले महापात्र हे पहिलेच अधिकारी. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून गुजरातच्या सेवेतील भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांना नवी दिल्लीत बरे दिवस आले. महापात्र हे मूळचे ओडिशातील असले तरी १९८६ च्या गुजरात कॅ डरचे अधिकारी होते. मोदी दिल्लीत आल्यावर गुजरातमधील अनेक अधिकारी केंद्रात प्रतिनियुक्तीवर आले त्यापैकी महापात्र हे एक. दोन वर्षांपूर्वी बढती मिळून त्यांची उद्योग खात्याचे सचिव म्हणून नियुक्ती झाली. मोदींचा महत्त्वाकांक्षी ‘स्टार्टअप इंडिया’ प्रकल्प मार्गी लावण्याची जबाबदारी महापात्रांकडे होती. प्राणवायूअभावी रुग्ण दगावत असल्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर केंद्र सरकारने, प्राणवायू उपलब्ध व्हावा म्हणून कृतिगटाची स्थापना केली व उद्योग खात्याचे सचिव म्हणून महापात्रा यांच्याकडे सूत्रे सोपविली. खासगी उद्योगसमूह, तेल व पोलाद कंपन्या, संरक्षण दल, रेल्वे आदींशी समन्वय साधून रुग्णालयांना जास्तीत जास्त प्राणवायू मिळेल यावर महापात्र यांनी भर दिला होता.

महापात्र यांना एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात करोनाचा संसर्ग झाला; पण अशा परिस्थितीतही त्यांनी प्राणवायू उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. अगदी श्वास घेण्यास त्रास होईपर्यंत ते आपली जबाबदारी पार पाडत होते. बोलणे अशक्य झाल्यावरच ते रुग्णालयात दाखल झाले. स्वत:ला त्रास होत असतानाही प्राणवायू उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी शेवटपर्यंत केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे होते, ही कॅबिनेट सचिव राजीव गऊबा यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद, सुरत शहरांचे आयुक्त म्हणून त्यांनी चांगले काम केले होते.