मुलगा होणार म्हणून आई-वडिलांनी अमृत असे नाव ठरवले होते. पण चार बहिणींच्या पाठीवर पुन्हा एक मुलगीच जन्माला आली. गुजरातमधील पुराणमतवादी घरात त्यामुळे आनंद विरून गेला.. अमृतची अमृता झाली.. पण नंतर तिने देशासाठी जे अमृतसिंचन केले त्यातून पर्यावरणाचे रक्षण झाले. धरणीमातेला न्याय मिळाला.. दूध उत्पादनात ऑपरेशन फ्लड मोहिमेत ती अग्रेसर होती. या कर्तृत्ववान महिलेचे नाव आहे अमृता पटेल. त्यांना ‘महिंद्रा समृद्धी कृषी शिरोमणी पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. त्या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या बरीच वर्षे अध्यक्षा होत्या.
आताचा हा पुरस्कार कृषी क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जातो. त्यांचे वडील एच. एम. पटेल हे आयसीएस अधिकारी व राजकीय नेते. वटवृक्षाच्या सावलीत रोपटी वाढत नाहीत पण अमृता पटेल यांनी स्वत:ची ओळख तयार केली. भारतात ज्यांनी गुजरातमध्ये दूध उत्पादनात क्रांती केली ते वर्गीस कुरियन हे अमृता पटेल यांचे या क्षेत्रातील मार्गदर्शक. १९९८ ते २०१४ या काळात त्या राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या अध्यक्षा होत्या. ‘ऑपरेशन फ्लड’मध्ये ग्रामीण जीवनाचे अर्थकारण बदलले. वंचित व छोटय़ा शेतकऱ्यांनी श्वेतक्रांतीचे शिवधनुष्य उचलले त्यात कुरियन यांच्याबरोबरच अमृता पटेल यांचे मोठे काम होते. खरा विकास हा संस्था उभ्या केल्याशिवाय होत नाही. ग्रामीण उत्पादकांना राष्ट्रीय अर्थप्रवाहात आणले पाहिजे असे त्यांचे मत आहे. दूध व्यवसायातील सहकाराची मूल्यव्यवस्था रुजवण्यात पटेल यांचा मोठा वाटा आहे. ऑपरेशन फ्लड योजनेत एक लाख दूध सहकारी सोसायटय़ा सुरू झाल्या. १.३० कोटी शेतकरी त्याचे सदस्य बनले, एक लाख खेडय़ांनी त्यामुळे कात टाकली. १९६७ मध्ये दुधाची दरडोई उपलब्धता दिवसाला १०६ ग्रॅम होती ती २००९ मध्ये २५८ ग्रॅम झाली. तो दूधक्रांतीचा परिणाम होता. गरिबांची स्थिती सुधारताना पर्यावरणाच्या रक्षणातही अमृता यांचा मोठा वाटा आहे. त्यासाठी त्यांनी ‘फाऊंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटी’ ही संस्था स्थापन केली.
आता भारतातील सहा राज्यांत १८३० खेडय़ांत या संस्थेचा विस्तार आहे. त्यांनी १,०७,००० हेक्टर जमीन सामाजिक प्रशासनाखाली आणली. अमृता यांचा जन्म दक्षिण गुजरातच्या खेडा जिल्ह्य़ातील विद्यानगरचा. माध्यमिक शिक्षण कॉन्व्हेंट ऑफ जिझस अ‍ॅण्ड मेरी या दिल्लीतील शाळेत झाले. त्यांची पदवी आहे पशुविज्ञान व कृषी क्षेत्रातली. बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजमध्ये त्या शिकल्या. ब्रिटनमधील अबेरदीनच्या रोवेट रिसर्च इन्स्टिटय़ूट या पशुपोषण संस्थेत त्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यांना परदेशात काम करता आले असते पण त्या पुन्हा खेडा जिल्ह्य़ात आल्या व कंजारी येथील पशुखाद्य कारखान्यात पशुपोषण अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. कर्नाल येथील दुग्ध संशोधन संस्थेतही त्यांनी काम केले. कृषी खात्यात त्या अतिरिक्त सचिव होत्या. पद्मविभूषण, नॉर्मन बोरलॉग या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसह अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.