ग्रहांच्या संशोधनात ज्या मोजक्या भारतीय वैज्ञानिकांनी मोलाचे संशोधन केले आहे, त्यात विक्रम साराभाई अवकाश केंद्राच्या स्पेस फिजिक्स लॅबोरेटरीचे संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांचा समावेश आहे. त्यांना यंदा भौतिकशास्त्रात प्रतिष्ठेचा इन्फोसिस पुरस्कार जाहीर झाला आहे.

उत्तर प्रदेशात जन्मले असले तरी गेली दोन दशके संशोधनाच्या निमित्ताने केरळ हीच त्यांची कर्मभूमी आहे. मंगळ व गुरूचा चंद्र युरोपा यांच्या वायुरूपातील वातावरणाचा अभ्यास त्यांनी केला आहे. त्यांच्या मते त्यातून या दोन ठिकाणी जीवसृष्टीची शक्यता नसली, तरी ग्रहमालेची उत्पत्ती कशी झाली यावर प्रकाश पडू शकतो. सूर्याभोवतीच फिरणारे दोन ग्रह असले, तरी पृथ्वी व मंगळ यांच्यात फरक आहे. पृथ्वीवर नायट्रोजन व ऑक्सिजन भरपूर आहे तर मंगळावर कार्बन डायॉक्साइड जास्त आहे. मंगळावर नैसर्गिक प्रक्रियातून निर्माण होणाऱ्या मिथेनचे अस्तित्व असले, तरी त्यामुळे तेथे जीवसृष्टी असेलच असे म्हणता येत नाही, असे ते सांगतात. भारद्वाज हे मार्स एक्सोस्फेरिक न्यूट्रल कम्पोझिशन अ‍ॅनलायझर या प्रयोगात मुख्य संशोधक आहेत. चंद्रा अ‍ॅटमॉस्फेरिक कम्पोझिशन एक्सप्लोरर या चांद्रयान दोनमधील प्रयोगाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. भारद्वाज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलिगडचा, त्यांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण लखनौ विद्यापीठातून झाले. वाराणसीच्या दी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी २००२ मध्ये ग्रह व अवकाश विज्ञान या विषयात पीएचडी केली. त्यांनी आतापर्यंत गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो, युरोपा, गिनीमीड, ट्रिटॉन, टायटन या ग्रह व उपग्रहांवर संशोधन केले आहे. शनीची कडी, मंगळ, शुक्र, धूमकेतू हेही त्यांच्या संशोधनाचे विषय राहिले. चांद्रयान १ मोहिमेत त्यांनी सारा म्हणजे अ‍ॅटॉमिक रिफ्लेक्टिंग अ‍ॅनलायझर प्रयोगात मोठी भूमिका पार पाडली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर चंद्रा क्ष किरण दुर्बीण, हबल दुर्बीण, न्यूटन एक्सरे दुर्बीण तसेच भारतातील जीएमआरटी रेडिओ दुर्बीण या प्रकल्पातही त्यांनी काम केले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय नियतकालिकांचे अतिथी संपादक म्हणून काम करतानाच त्यांनी एकूण १२० शोधनिबंध लिहिले आहेत. भारतातील अनेक अवकाश संशोधन मोहिमांच्या नियोजन समित्यांवर त्यांनी काम केले. आताचा पुरस्कार त्यांना चांद्रयान १ व मंगळ मोहिमेतील काही प्रयोगांसाठी देण्यात येत आहे. ग्रह संशोधनातून पृथ्वीची निर्मिती व आगामी काळात होणारे त्यातील बदल यावर प्रकाश पडतो, त्यामुळे त्यांचे संशोधन त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. शनीच्या कडय़ातून बाहेर पडणारे क्ष किरण, गुरू व शनीतून निर्माण होणाऱ्या क्ष किरणज्वाला याबाबत त्यांनी पायाभूत संशोधन केले आहे. यापूर्वी त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.