निसर्गाची अनेक रूपे आपल्याला बघायला मिळतात त्यातील वैविध्य ज्यांनी ते प्रत्यक्ष बघितले आहे अशा निसर्गातील मुशाफिरांना, रानोमाळी भटकून संशोधन करणाऱ्या अवलिया जीवशास्त्रज्ञांनाच कळत असते. प्रा. डॉ. अंजली रॉय यांनी त्यांचे जीवन अशाच एका वरकरणी छोटय़ा, पण अभ्यासासाठी मोठय़ा विषयास वाहिले होते तो विषय म्हणजे कवकशास्त्र. नुकतेच त्यांचे निधन झाले.

अंजली रॉय यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात बांगलादेशातील राजशाही येथे १९३० मध्ये झाला. जेव्हा मुली उच्च शिक्षण फारसे घेत नसत त्या काळात त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून वनस्पतिशास्त्रात पदवी घेतली. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी डॉ. एस. एन. बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पीएच. डी. केली, तरी त्यांचा शिक्षणाचा उत्साह वाढतच राहिला. नंतर त्यांनी कोलकाता विद्यापीठातून डी. एस्सी. पदवी घेतली. इतक्या जुन्या काळात त्यांच्यासारख्या महिलेने विज्ञान क्षेत्रात संशोधनात दाखवलेली जिद्द व चिकाटी महत्त्वाची होती. त्यानंतर डॉ. अंजली यांनी कॅनडात डॉ. माइलड्रेड के नोबेल्स यांच्या नेतृत्वाखाली लाकूड सडवणाऱ्या पॉलिपोअर्स या कवकावर संशोधन केले. त्यात त्यांनी पॉलिपोअर्सची वाढ, वैज्ञानिक नामकरणे, त्यांचे विविध प्रकार यांचा अभ्यास केला. या पॉलिपोअर्सवर रसायनांचा नेमका काय परिणाम होतो हे तपासले. त्यानंतर त्यांनी पॉलिपोअर्सच्या जैवरासायनिक गुणधर्मावर त्यांची जुळी बहीण व कोलकात्यातील बोस संस्थेत काम करणाऱ्या वैज्ञानिक डॉ. आरती दास यांच्यासमवेत संशोधन केले. त्यांनी कोलकाता येथील कवक वैद्यक विज्ञान विभागाच्या स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेत कवकांचा वैद्यकशास्त्रीय अभ्यास केला. त्यांनी कवकशास्त्रात अनेक शोधनिबंधही लिहिले, अध्यापन, संशोधनात त्यांनी तरुण पिढीला नेहमीच प्रोत्साहन दिले. १९७४ मध्ये त्या पश्चिम बंगालमध्ये वर्धमान विद्यापीठात प्राध्यापक होत्या व नंतर त्यांनी शांतिनिकेतन येथे विश्वभारती विद्यापीठात १९७९ मध्ये अध्यापन केले. १९९५ मध्ये त्या तेथून निवृत्त झाल्या. त्यांनी पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. आरती दास यांच्यासमवेत संशोधन केले. त्यांच्या संशोधनाला भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेली होती. डॉ. टेक्सिरिया, डॉ. फिडालेदो, डॉ. फुर्टाडो, डॉ. पर्मास्टो, डॉ. अलेक्स डेव्हिड, डॉ. बोइडीन, डॉ. राजशेनबर्ग, डॉ. राईट, डॉ. रायवर्डेन, डॉ. गिरबर्टसन, डॉ. लार्सन, डॉ. गिनस अशा अनेक विद्वान या मोठय़ा वैज्ञानिकांनी त्यांच्या संशोधनाची प्रशंसा केली होती.

प्रा. अंजली रॉय यांनी दहा विद्यार्थ्यांना पीएच. डी.साठी मार्गदर्शन केले.  ब्रिटनमधील रॉयल बोटॅनिकल गार्डन्स, रशियातील द अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ एस्टोनियन इन्स्टिटय़ूट ऑफ झूलॉजी अ‍ॅण्ड बॉटनी या नामांकित संस्थांत संशोधनाची संधी त्यांना मिळाली होती. त्यांनी त्यांचे विद्यार्थी डॉ. ए. बी. डे यांच्या समवेत लिहिलेले पॉलिपोरास ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. डे यांनी डॉ. अंजली यांच्या सन्मानार्थ पॉलिपोरास प्रवर्गात एका कवकास रॉयोपोरस असे नाव दिले होते. अफिलोफोरालेचा माहितीसंच म्हणजे डाटाबेस त्यांनी तयार केला तो अफिलोफंगल डाटाबेस म्हणून प्रसिद्ध आहे. तो तयार करण्यात डॉ. किरण रणदिवे, प्रा. नीता जगताप, डॉ. हर्षवर्धन खरे यांनी योगदान दिले होते. विशेष म्हणजे. डॉ. अंजली रॉय यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सन्मान केला होता. आजच्या काळात कवकशास्त्राच्या अभ्यासाकडे फारसे कुणी वळत नाही, पण डॉ. रॉय यांच्या कारकीर्दीकडे पाहून तरी या शास्त्राकडे काही तरुण-तरुणींनी वळणे आवश्यक आहे, तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.