23 July 2019

News Flash

डॉ. अराटा इसोकाझी

‘स्थापत्यशास्त्राची गरज ही जागतिक व स्थानिक अशा दोन्ही पातळ्यांवर असते.

डॉ. अराटा इसोकाझी

स्थापत्यविशारद अराटा इसोझाकी यांनी वयाची तिशी गाठण्याच्या आतच जगभर प्रवास केला होता, त्यामुळे त्यांच्या सर्वच स्थापत्यकृतींमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसून येते. पौर्वात्य आणि पाश्चात्त्य वास्तुरचनांचा, त्यांमागील सौंदर्यदृष्टीचा मिलाफ घडवून आणणाऱ्या इसोझाकींना ४२ वा प्रिट्झकर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार म्हणजे स्थापत्यशास्त्रातील नोबेलच. जपानमध्येच राहणारे इसोझाकी हे स्थापत्यविशारद तर आहेतच, पण त्यातील सैद्धांतिक ज्ञानातही ते आघाडीवर आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानमधील शहरांची फेरबांधणी महत्त्वाची होती, त्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली, त्यांनी वेगळ्या नजरेतून जगाकडे पाहिले. वयाच्या तिशीआधीच दहा वेळा प्रवास केला, इस्लामी जगापासून चीन व आग्नेय आशियातील लहान खेडी आणि अमेरिकेतील महानगरांपर्यंतच्या वास्तू आणि लोकजीवनही पाहिले. स्थापत्यकला म्हणजे नेमके काय असा प्रश्न ते सतत स्वत:ला विचारत राहिले. ओईटा या त्यांच्या मूळ गावी त्यांनी अनेक इमारतींची रचना केली. याशिवाय लॉस एंजलिस येथील म्युझियम ऑफ कण्टेम्पररी आर्ट, द पलाऊ सेंट जॉर्डी या त्यांच्या स्थापत्यरचना विशेष होत्या.

‘स्थापत्यशास्त्राची गरज ही जागतिक व स्थानिक अशा दोन्ही पातळ्यांवर असते.. ही कला म्हणजे केवळ परंपरेला कवटाळणे नाही तर बाहेरील जगाचा वेध घेऊन त्यातूनही जे नवीन आहे त्याचा समावेश करणे महत्त्वाचे आहे’ असे ते मानतात.  प्रिट्झकर पुरस्कार हा या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार १९७९ पासून दरवर्षी या क्षेत्रात वेगळी कामगिरी करणाऱ्या स्थापत्यविशारदांना दिला  जातो. इसोझाकी यांचे या क्षेत्रातील गुरू केन्झो टँगे त्यांनाही यापूर्वी हा पुरस्कार मिळाला आहे. जपानमधील क्युशू बेटांवर जन्मलेल्या इसोझाकी यांच्यावर दुसऱ्या महायुद्धातील विनाशाच्या दु:खद छटांची छाया होती. शून्यातून एखादे राष्ट्र उभे करतानाही सौंदर्यदृष्टी राखण्याचे कसब त्यांनी दाखवले. त्यांनी लहानपणी कुठले शहर किंवा इमारती पाहिल्याच नाहीत, पाहिले ते भग्नावशेष. ती स्थापत्यकलेतील एक मोठी पोकळी त्यांच्या मनात घर करून होती. तीच त्यांची प्रेरणा ठरली. लॉस एंजल्समधील पहिली आंतरराष्ट्रीय वास्तू उभी करताना त्यांच्या मनात भारतातील तांबडय़ा वालुकाश्माच्या इमारती होत्या, २०११ मध्ये सुनामीच्या तांडवानंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर दृश्यकलावंत अनिश कपूर यांच्या समवेत एका फिरत्या ‘कन्सर्ट हॉल’ची निर्मिती केली. कोलंबिया, हार्वर्ड व येल विद्यापीठातून अध्यापन करताना त्यांनी अनेक विद्यार्थीही घडवले. रिबा सुवर्णपदकोसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

First Published on March 13, 2019 12:23 am

Web Title: dr arata isokajhi profile