बीएस्सी करूनही तुम्ही संशोधनात नाव कमावू शकता. भारतातील विद्यार्थ्यांनी मूलभूत संशोधनाची निवड करिअरसाठी करावी, असे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. अर्णब डे. त्यांच्या संशोधनाला प्रतिष्ठेचा स्प्रिंगर थिसिस (शोधनिबंध) पुरस्कार नुकताच मिळाला आहे. वेगळ्या वाटेने जाणाऱ्या संशोधनासाठी दिला जाणारा पुरस्कार भारतीय वंशाचे अर्णब डे यांना मिळाल्याने संशोधन क्षेत्राच्या महत्त्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. जनुकीय बदल करून तयार केलेल्या उंदरात कर्करोग निष्प्रभ करणाऱ्या ‘ए२०’ या जनुकाचा वापर डे यांनी केला; त्याविषयीच्या शोधनिबंधाला हा पुरस्कार मिळाला आहे. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठाने अर्णब डे यांचा शोधनिबंध स्पर्धेसाठी पाठवला होता. डे यांनी पेप्टाईडवर आधारित असलेली मधुमेहावरची औषधे तयार करण्यात मोठे संशोधन केले आहे. त्यासाठी त्यांना तरुण नवप्रवर्तक पुरस्कारही यापूर्वी मिळाला होता. स्प्रिंगर ही शोधनिबंधाच्या प्रकाशनातील एक ख्यातनाम संस्था आहे. त्यांची संशोधन निबंधांना पुरस्कार देण्याची ही कल्पनाही तितकीच महत्त्वाची व तरुणांना संशोधनासाठी प्रेरणा देणारी आहे.  म्हणजे डे यांनी त्यांचा शोधनिबंध क्रिकेटमध्ये दंतकथा बनलेला सचिन तेंडुलकर व तो जिथे शिकला त्या कोलकाता प्रेसिडेन्सी विद्यापीठाला अर्पण केला आहे. शिक्षण व क्रीडा या दोन गोष्टींचा माझ्यावर प्रभाव आहे. सचिनने त्याच्या क्रिकेटमधून मलाच नव्हे तर संपूर्ण तरुण पिढीला आनंद देतानाच प्रेरणाही दिली असे डे यांचे म्हणणे.

थोडी बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम, सहकाऱ्यांशी संवाद व हसरा चेहरा ही अर्णब यांच्या यशाची गुरुकिल्ली. देशाच्या सीमा देश घडवत नाहीत तर लोक देश घडवतात असा त्यांचा विश्वात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन. ते पेशाने डॉक्टर असलेल्या वडिलांनाच गुरू मानतात, त्यांनीच अर्णबला प्रोत्साहन दिले, संशोधनात गोडी निर्माण केली. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये असतानाही त्यांना जे प्राध्यापक लाभले ते संशोधनास प्रोत्साहित करणारे होते. तेथून पदवी घेतल्यानंतर त्यांना ब्राऊन, डार्टमाउथ व कोलंबिया अशा तीन विद्यापीठांच्या पर्यायांतून कोलंबियाची निवड केली कारण ते न्यूयॉर्कमध्ये असल्याने देशोदेशीच्या वैज्ञानिकांच्या भेटीगाठी तेथेच शक्य होत्या. कोलंबिया विद्यापीठात भारतीय वंशाचे अमेरिकी प्रतिकारशक्तीतज्ज्ञ (इम्युनॉलॉजिस्ट) प्रा. शंकर घोष यांचे मार्गदर्शन अर्णब यांना मिळाले. अर्णब यांनी रसायनशास्त्रात ब्लुमिंग्टनच्या इंडियाना विद्यापीठातून एमएस केले, तेथे प्रा. रीचर्ड दिमार्ची त्यांचे मार्गदर्शक होते. त्यांना भारताविषयी बरीच माहिती होती, त्यामुळे त्यांनी अर्णब यांना मनापासून मदत केली. पदव्युत्तर अभ्यासासाठी अमेरिकेत या असे त्यांचे तरुणांना सांगणे आहे. अमेरिकेत संधी भरपूर असल्या तरी येथील सर्व संस्था चांगल्या आहेत असे नाही, त्यामुळे तुम्हाला तुमच्या निवडी सतत पारखून घ्याव्या लागतात, असे ते सांगतात.  चांगली संधी मिळाली तर भारतात परतण्याची त्यांची इच्छा आहे.