आपण अणूला किंवा कुठल्याही सूक्ष्म घटकाला चिमटीत पकडू शकतो का, याचे उत्तर सगळे जण नाही असेच देतील. पण अत्यंत सूक्ष्म घटकांना चिमटीत पकडण्याची करामत अमेरिकी भौतिकशास्त्रज्ञ डॉ. आर्थर अ‍ॅशकिन यांनी साध्य केली होती. त्यामुळे अगदी सूक्ष्म घटकांचा स्थिर अवस्थेत अभ्यास शक्य झाला. या संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील नोबेलने गौरविलेल्या डॉ. अ‍ॅशकिन यांचे अलीकडेच निधन झाले.

अ‍ॅशकिन यांनी वरील संशोधनासाठी बनविलेले उपकरण होते- ‘ऑप्टिकल ट्वीझर’ म्हणजे प्रकाशीय चिमटा! प्रकाशाची शक्ती वापरून अगदी सूक्ष्म घटकांचा जवळून अभ्यास करणे या प्रकाशीय चिमटय़ांच्या मदतीने त्यांनी शक्य करून दाखवले. चिमटय़ांच्या मदतीने विषाणू, जिवाणू यांच्यासह अनेक सूक्ष्मजीवांनाही एका ठिकाणी पकडून ठेवून अभ्यास करता येतो. डीएनए, आरएनए यांसारख्या सूक्ष्म जैविक घटकांच्या अभ्यासासाठी हे तंत्र क्रांतिकारी ठरले. १९७० साली एका शोधनिबंधात त्यांनी या तंत्राचे स्पष्ट भाकीत केले होते. त्यानंतर दहा वर्षांनी अमेरिकेतील बेल प्रयोगशाळेत काम करीत असताना त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने या प्रकाशीय चिमटय़ात काही सूक्ष्म घटक पकडून दाखवले. खरे तर, सूक्ष्म जैविक घटक स्थिर अवस्थेत पकडता येतील आणि प्रकाश तंत्राने जखमा भरता येतात, असे अ‍ॅशकिन म्हणाले होते तेव्हा त्यावर कोणाचा विश्वास बसला नव्हता. पण त्यांनी पॅरामेशियम हा एकपेशीय जीव, तंबाखूवरील विषाणू प्रकाशीय चिमटय़ात पकडून दाखवले आणि डीएनएची नक्कल होण्याची प्रक्रिया याचि देही याचि डोळा सर्वानी पाहिली!

आर्थर अ‍ॅशकिन यांचा जन्म ब्रुकलीनमध्ये १९२२ साली झाला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान आण्विक अस्त्रनिर्मितीसाठी अमेरिकेने राबविलेल्या मॅनहटन प्रकल्पातील वैज्ञानिक ज्युलियस अ‍ॅशकिन हे त्यांचे बंधू. ज्युलियस यांच्या प्रेरणेने आर्थर यांनी कॉर्नेल विद्यापीठात आण्विक भौतिकशास्त्राचे धडे गिरवले. तिथे हॅन्स बेथ व रिचर्ड फेनमन यांच्यासमवेत त्यांना काम करायला मिळाले. प्रकाशीय चिमटय़ांव्यतिरिक्त आर्थर यांनी प्रकाशीय अपवर्तनाच्या परिणामांचा अभ्यास केला होता. त्याचा उपयोग होलोग्राम व अधिक शक्तिशाली संगणकासाठी करता येतो. संगणकात विजेऐवजी प्रकाश वापरून माहिती साठवता येते हे त्यांनी यातून दाखवून दिले.

प्रकाशीय चिमटय़ांच्या क्रांतिकारी संशोधनात सहभागी शास्त्रज्ञ स्टिव्हन चू यांना १९९७ मध्येच नोबेल मिळाले; पण अ‍ॅशकिन यांना बरेच उशिरा, २०१८ साली नोबेल जाहीर झाले. त्याबद्दल तेव्हा विचारले असता ते म्हणाले होते, ‘‘जुन्या गोष्टी साजऱ्या करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. मी सध्या नवा शोधनिबंध लिहितो आहे.’’ तेव्हा त्यांचे वय होते अवघे ९६ वर्षे!