News Flash

डॉ. आशा सावदेकर

अवघा महाराष्ट्र आशा सावदेकरांना समीक्षक म्हणून ओळखत असला तरी त्या स्वत: सिद्धहस्त लेखिकाही होत्या.

डॉ. आशा सावदेकर

समीक्षकाच्या अंगी सौंदर्यशोधकाची दृष्टी असणे नितांत गरजेचे असते. त्या बळावरच समीक्षक लेखनातील मूल्यगर्भी, गूढात्म अन् चिंतनवेधाच्या नोंदी वाचकांसमोर ठेवत असतो. डॉ. आशा सावदेकर यांच्या ठायी असलेली ही दृष्टी समृद्ध अशी होती. ज्या साहित्याची समीक्षा करायची आहे ते वरवरून कितीही शब्दवेल्हाळ वाटत असले तरी त्यातला नेमका अर्थकाहूर हेरून त्याची कठोरतेने वस्तुनिष्ठ मीमांसा हे डॉ. आशा सावदेकरांचे वैशिष्ट्य होते. तत्कालीन नागपूर विद्यापीठात दीर्घकाळ अध्यापनकार्य करताना डॉ. आशा सावदेकर यांनी मर्मग्राही, वस्तुनिष्ठ परंतु रसस्पर्शी अशी समीक्षावृत्ती असलेल्या विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या. त्यांची एक ओळख जशी प्रख्यात लेखिका व समीक्षक ही होती, तशी दुसरी ओळख विद्यार्थिप्रिय प्राध्यापक अशीही होती. त्या नागपूर विद्यापीठात अध्यापनासाठी आल्या तेव्हा महाराष्ट्रातील नामांकित साहित्यिकांची मांदियाळीच तेथे कार्यरत होती. आशा सावदेकरांनी या साहित्यिक प्राध्यापकांच्या वलयक्षेत्राबाहेर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्या मूळच्या आशा गजानन भवाळकर. जन्म नागपुराचाच. भा. रा. तांबे यांच्यासंबंधीचा प्रबंध ‘कविवर्य भा. रा. तांबे : एक चिकित्सक अभ्यास’ (१९७९) हे त्यांचे पहिले महत्त्वपूर्ण काम. त्यानंतर ‘पु. भा. भावे : साहित्यवेध’ (१९८९), ‘भारतीय साहित्याचे शिल्पकार : ना. सी. फडके’ (१९९५), ‘मुशाफिरी’ (काव्यात्म समीक्षा, २०००) ही त्यांची समीक्षात्मक पुस्तकेही विशेष दखलपात्र ठरली. आशा सावदेकरांनी विदर्भातील अनेक नामवंत कवींचा परिचय करून देणारी लेखमालाही लिहिली. मराठी साहित्याच्या विद्यार्थ्यांसाठी हा जणू ऐतिहासिक दस्तऐवज आहे. अवघा महाराष्ट्र आशा सावदेकरांना समीक्षक म्हणून ओळखत असला तरी त्या स्वत: सिद्धहस्त लेखिकाही होत्या. १९७७ साली, अर्थात लेखनकार्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ ही कादंबरी लिहिली. जयकृष्ण केशव उपाध्ये हे विदर्भातील एक मान्यवर कवी. त्यांची कविता आशा सावदेकर यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह संपादित केली होती. विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ या मुखपत्राला त्यांनी आपल्या कल्पकतेने नवीन आयाम दिला. ‘युगवाणी’च्या आधारे अनेक नवीन लिहित्या हातांना बळ दिले. त्यांची निर्मिती, अनुभव, काव्यभाषा, शैली वाचकाला ओढून घेणारी होती. वैदर्भीय प्रतिभेच्या डॉ. कुसुमावती देशपांडेंच्या परंपरेत त्यांच्या नंतरचे स्थान डॉ. आशा सावदेकर यांनी त्यांच्या व्यासंगाने आणि अतिशय कठोर परिश्रमाने निर्माण केले होते. त्यांच्या निधनाने ते स्थान आज रिक्त झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 12:01 am

Web Title: dr asha savadekar profile abn 97
Next Stories
1 अशोक तुपे
2 योगेश रावळ
3 एम. नरसिंहम
Just Now!
X