विश्वातल्या पदार्थ-वस्तूंची रचना (मॅटर) आणि त्यांच्यातील कार्यरत बले (फोर्सेस) कळली की विश्व समजेल, असा कयास आहे. मग या दोहोंना एकत्रित गुंफणारा नियम (युनिफिकेशन थिअरी) मांडला, तर विश्वनिर्मितीचे कोडे सुटण्याची शक्यता निर्माण होणार होती. १९७०च्या दशकात पदार्थातील चारपैकी तीन बलांचा (विद्युतचुंबकीय, स्ट्राँग आणि वीक) एकत्रित विचार करणारी ग्रँड युनिफिकेशन थिअरी आली; मग या सर्वाचा व गुरुत्वाकर्षण या चौथ्या बलाचाही विचार करणाऱ्या स्ट्रिंग थिअरीचा जन्म १९८०च्या दशकात झाल्याने विश्वरहस्ये उलगडण्याची आशा दृढावली. याच काळात, तोपर्यंत अणूच्या अंतरंगात गुरफटलेले विज्ञानजगत अंतराळाकडेही पाहू लागले आणि कृष्णविवराच्या संशोधनाकडे वळले. या साऱ्या संशोधनास गेली पाच दशके प्रत्यक्षाप्रत्यक्ष गती देणाऱ्या इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्स (आयसीटीपी) या इटलीस्थित संशोधन संस्थेच्या संचालकपदी गेल्याच आठवडय़ात डॉ. अतीश दाभोलकर यांची निवड झाली. कृष्णविवरातून ऊर्जा सतत बाहेर टाकली जाते, असा सिद्धांत स्टीफन हॉकिंग यांनी मांडल्यानंतर कृष्णविवराच्या तापमानाबद्दल प्रश्न निर्माण झाला. त्यावर संशोधन करणाऱ्यांत डॉ. अतीश दाभोलकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. कृष्णविवरांची पुंजकीय (क्वांटम) संरचना, हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. स्ट्रिंग थिअरीवरही त्यांनी संशोधन केले, ते ‘मूलभूत’ मानले जाते. इतके की, त्यांनी लिहिलेला शोधनिबंध वाचून खुद्द स्टीफन हॉकिंग त्यांना भेटायला आले होते. संशोधनाच्या जगात वावरणाऱ्यांच्या अशा भेटी होतातच; पण डॉ. दाभोलकर यांचे कौतुक यासाठी की, त्यांच्या पाठपुराव्यामुळे हॉकिंगनी मुंबईत येऊन व्याख्यान दिले होते! संशोधन संस्था हव्यातच, पण विज्ञान जनमानसात झिरपण्यासाठी विज्ञानाची संस्कृती रुजवावी लागते, यावर आपले काका डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याप्रमाणेच त्यांचाही विश्वास आहे. महाराष्ट्रातील सर्वार्थाने आधुनिक असलेल्या या कुटुंबातील शेतीशास्त्रज्ञ श्रीपाद दाभोलकर यांचे ते पुत्र. कोल्हापुरात १९६३ साली जन्मलेल्या डॉ. अतीश यांचे सुरुवातीचे शिक्षण गारगोटी येथे झाले. पुढे कानपूरच्या आयआयटीत पदवी घेतल्यानंतर प्रिन्स्टन विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळवली. मग १९९६ ते २०१० पर्यंत मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत त्यांनी अध्यापन केले. संशोधन कार्यासाठी २००६ साली शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. २०१४ सालापासून ते आयसीटीपीमध्ये कार्यरत होते; लवकरच चार नव्या शाखा स्थापन होणाऱ्या या संस्थेचे प्रमुखपद डॉ. दाभोलकरांकडे येणे, हे त्यांच्या संशोधन कार्यावरील व्यापक विश्वासाचेच द्योतक आहे.