News Flash

डॉ. बी. बी. गायतोंडे

१९७२ मध्ये हाफकिन संस्थेचे प्रमुखपद (संचालक हे पद) त्यांनी स्वीकारले.

डॉ. बी. बी. गायतोंडे

‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ची आठवण आज निघते ती, करोनाहून अधिक संहारक अशा प्लेगवरील लस मुंबईच्या या संस्थेत उत्पादित झाली यानिमित्ताने किंवा एके काळी कॉलरा (पटकी) प्रतिबंधक लस असो की सर्पदंशावरील उपाय, हीच संस्था पुढे असायची… आदी स्मरणरंजनातून. डॉ. वाल्देमार हाफकिन यांचे नाव धारण करणाऱ्या या संस्थेची जागतिक कीर्ती पुढील काळातही वाढवण्याचे श्रेय ज्यांना आहे, त्यांपैकी एक म्हणजे या संस्थेचे माजी संचालक व निवृत्तीनंतर सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे डॉ. बी. बी. गायतोंडे. त्यांचे पूर्ण नाव भिकाजी बळवंत गायतोंडे. बांदा (जि. सिंधुदुर्ग) या मूळ गावी त्यांचे अलीकडेच, वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले.

बांदा गावातच प्राथमिक शिक्षणात चमक दाखवल्याने एका परिचितांनी त्यांना मुंबईस नेले, तिथे माध्यमिक शिक्षणाची सोय केली. मुंबईच्या विल्सन कॉलेजात असताना १९४२च्या चळवळीसाठी गायतोंडे यांनी काही काळ शिक्षण सोडले होते! मात्र पुढे इंटर सायन्सला प्रथम क्रमांक मिळवून, जीएस वैद्यकीय महाविद्यालयात ते शिकू लागले. १९५० मध्ये ‘एमबीबीएस’ झाल्यावर पदव्युत्तर शिक्षणासाठी औषधनिर्माणशास्त्र शाखेत प्रवेश घेऊन या महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या केईएम रुग्णालयात ते रुग्णसेवाही करू लागले. पण महाविद्यालयाचे पहिले अधिष्ठाता जीवराज मेहता आणि तत्कालीन अधिष्ठाता डॉ. आर. जी. धायगुडे यांच्याप्रमाणेच, आपलाही ओढा संशोधनाकडे आहे, हे त्यांनी वेळीच ओळखले आणि १९५५ पासून, पूर्णवेळ संशोधन करण्याचा निर्णय घेतला. जागतिक आरोग्य संघटनेची संशोधनपद्धती-अभ्यासवृत्ती, युरोपातील विद्यापीठ-भेटींसाठी याच जागतिक संस्थेची निराळी शिष्यवृत्ती, पुढे अमेरिकेची ‘रॉकफेलर शिष्यवृत्ती’ अशी दाद त्यांच्या गुणवत्तेला मिळत गेली. १९७२ मध्ये हाफकिन संस्थेचे प्रमुखपद (संचालक हे पद) त्यांनी स्वीकारले. या संस्थेत त्यांनी प्रगत कॉलरा लशीचे, तसेच विषमज्वरावरील औषधाचे संशोधन केले. त्यासाठी १९७७ मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा ‘डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार’ त्यांना मिळाला आणि राष्ट्रीय आयुर्विज्ञान अकादमीने आजीवन सन्मान्य सदस्य म्हणून त्यांना स्वीकारले. युरोपातील काही विद्यापीठांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्य, ‘जागतिक आरोग्य संघटने’साठी आग्नेय आशियातील सल्लागार समितीवर काम आणि त्या पदावरून, दक्षिण व आग्नेय आशियाई देशांमधील सर्पदंश-उपचार व संशोधनात सुसूत्रता आणण्यासाठी पुढाकार, हे त्यांच्या कारकीर्दीचे उल्लेखनीय पैलू. ही कारकीर्द सचोटीची, गुणवत्तेला नेहमीच प्रोत्साहन देणारी होती, असे अनेक जण सांगतात. निवृत्तीनंतर त्यांचे जणू नवजीवन सुरू झाले. ‘महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ- बांदा’ आणि पुढे ‘डॉ. बी. बी. गायतोंडे चॅरिटेबल ट्रस्ट’मार्फत अनेक उच्चशिक्षण संस्था त्यांनी आकारास आणल्या. डॉ. गायतोंडे यांच्या निधनाने गुणवत्ता आणि सामाजिक जाणीव यांच्या मिलाफाचा एक आदर्श हरपला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 12:05 am

Web Title: dr b b gaitonde profile abn 97
Next Stories
1 वीरा साथीदार
2 तु. शं. कुळकर्णी
3 आय. ए. रहमान
Just Now!
X