विज्ञान क्षेत्रात व्यावसायिकतेचा आग्रह ज्यांनी धरला अशांपैकी एक म्हणजे प्रा. बलदेव राज. त्यांचे नुकतेच पुणे येथे एका परिषदेसाठी आले असताना निधन झाले. प्रा. बलदेव राज हे अणुवैज्ञानिक होते. त्यांचे बहुतांश संशोधन हे अणुक्षेत्रात असले तरी पदार्थ विज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान व विज्ञानविषयक धोरणे यांवरही त्यांनी बरेच काम केले होते. अणुशक्ती विभागात ते ४५ वर्षे कार्यरत होते. सध्याच्या काळात ऊर्जा, पाणी, आरोग्य सुविधा, उत्पादनक्षमतेत वाढ अशा बहुअंगी आव्हानांचा वेध त्यांच्या संशोधनाने घेतला. प्रत्यक्ष मानवी जीवनातील अनेक समस्यांवर उत्तरे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. बलदेव राज यांचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी मूलभूत संशोधन व उद्योग यांच्यातील दरी दूर करण्याचा केलेला प्रयत्न. सोडियम फास्ट रिअ‍ॅक्टर्स व त्याच्याशी संबंधित इंधनचक्र याचे संशोधन त्यांनी केले होते. याशिवाय वेिल्डग करोजन, फेरोफ्लुइड्स व सेन्सर्स हे त्यांचे संशोधनाचे विषय होते. त्यांनी एकूण ८० पुस्तके, १३०० शोधनिबंध व १०० लेख लिहिले आहेत. इंटरनॅशनल न्यूक्लियर एनर्जी अ‍ॅकॅडमी, इंटरनॅशनल अमेरिकन सोसायटी ऑफ मेटल्स, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ वेिल्डग इंटरनॅशनल अशा अनेक संस्थांवर त्यांनी काम केले. किमान तीस देशांतील संस्थांना त्यांच्या या क्षेत्रातील ज्ञानाचा लाभ झाला. वैज्ञानिक राजनय व वैज्ञानिक धोरण यात त्यांनी सरकारला मोठी मदत केली. पद्मश्री, होमी भाभा सुवर्णपदक, एच. के. फिरोदिया पुरस्कार, ओमप्रकाश भसीन पुरस्कार, वासविक पुरस्कार, इंडियन न्यूक्लियर सोसायटीचा जीवनगौरव, गुजरमल मोदी पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले.

कलपक्कम येथील इंदिरा गांधी सेंटर फॉर अ‍ॅटॉमिक रीसर्च या संस्थेत त्यांनी आधी काम केले नंतर ते नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज या संस्थेचे अलीकडे संचालक होते. त्यांचा जन्म काश्मीरमधला पण नंतर ते बंगलोरला स्थायिक झाले. रायपूर येथील पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली व नंतर बंगलोरच्या आयआयएससी या संस्थेतून पीएचडी केली. एनआयएएस या संस्थेत काम करताना त्यांनी अनेकांना संशोधनासाठी प्रोत्साहित तर केलेच शिवाय संशोधनासाठीचे अनुदानही वाढवून घेतले होते. कलपक्कम येथे संशोधन करताना त्यांनी फास्ट ब्रीडर टेस्ट रिअ‍ॅक्टर व फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर या दोन्ही प्रकारच्या अणुभट्टय़ांची प्रारूपे तयार करण्यात यश मिळवले. अणुसाहित्य, यांत्रिकी, नॅनोसायन्स (अब्जांश तंत्रज्ञान), रोबोटिक्स या क्षेत्रात अनेक संस्था उभ्या करण्यात त्यांचा वाटा होता. अणुशक्ती क्षेत्रात सुरक्षेचा प्रश्न हा जटिल असतो; त्यावरही त्यांनी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. डॉ. होमी भाभा यांनी भारतात अणुशक्तीचे रोपटे वेळीच लावले नसते तर आपण ऊर्जा क्षेत्रात मागे पडलो असतो. त्यांच्यानंतर ज्या वैज्ञानिकांनी अणुशक्ती क्षेत्रात संशोधन करून त्यांचे काम पुढे नेले त्यात बलदेव राज हे एक होते.