पृथ्वीच्या पोटात दडलेली माहिती, महासागरांचे गूढ यातून अवकाश संशोधनाच्या पायवाटाही रुंदावू शकतात. कॅनडाच्या डॉ. बार्बरा शेरवूड लॉलर या संशोधिकेने मात्र अवकाश व भूगर्भ संशोधनाचा समन्वय घालण्याची वेगळी वाट निवडली. त्यांना नुकताच कॅनडातील प्रतिष्ठेचा गेऱ्हार्ड हेर्झबर्ग पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. टोरांटो विद्यापीठात त्या पृथ्वी विज्ञान विषयाच्या प्राध्यापक आहेत, त्यांना विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात प्राचीन पाणी शोधून काढण्याचे श्रेय लॉलर यांना आहे. कुठल्याही अवकाश मोहिमेचा अंतिम हेतू हा पाण्याचा शोध हाच आहे. त्यामुळेच आधी मंगळ, मग गुरूचा चंद्र युरोपा, शनीचा चंद्र एनसेलडस यांच्यावर अवकाश वैज्ञानिकांनी लक्ष केंद्रित केले, पण हे सगळे संशोधन करण्याआधी पृथ्वीवरचे पाणी कसे आहे हे माहिती नसेल तर अवकाशात पाणी शोधण्याची दिशा चुकू शकते. त्यामुळे डॉ. शेरवूड लॉलर यांचे पृथ्वीवरील पाण्याचे संशोधन महत्त्वाचे आहे. त्यांनी पृथ्वीवरील प्राचीन पाण्यावर संशोधन केले आहे. त्याचा उपयोग युरोपा व एनसेलडस यांसारख्या चंद्रांवर पाणी शोधताना होणार आहे.

लॉलर यांनी जे पाणी शोधले आहे ते पृथ्वीवरचे दोन अब्ज वर्षांपूर्वीचे पाणी आहे. शाळेत असतानापासून त्यांना निसर्गाची ओढ होती. सागराच्या तळाशी सूर्याची ऊर्जा नसते तरीही तेथे जीव टिकून राहतात या औत्सुक्यातून त्यांनी भूगर्भशास्त्र निवडले, त्यातून त्यांनी या विषयात आपले वेगळे विश्व साकार केले, अवकाश संशोधनालाही दिशा दिली. काही वेळा जगण्यासाठी प्रकाशसंश्लेषणाची गरज नसते. जिवाणू हे खडक व पाणी यांच्या अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर जगतात असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. लॉलर यांचे संशोधन हे खगोलजीवशास्त्रज्ञ व खगोलभौतिकशास्त्रज्ञ यांनाही दिशादर्शक आहे. पृथ्वीपलीकडे जीवसृष्टी शोधण्याच्या नासाच्या एका संशोधन गटात डॉ. लॉलर सहभागी आहेत. पृथ्वी गेली अडीच अब्ज वर्षे ऑक्सिजनवर अवलंबून आहे हे खरे, पण पृथ्वीचे वय साडेचार अब्ज वर्षे आहे. मग आधीची काही वर्षे वातावरणात मुक्त ऑक्सिजन नसतानाही पृथ्वीवर जीवसृष्टी वेगळ्या स्वरूपात होतीच. एके काळी मंगळ हा ग्रह पृथ्वीपेक्षाही जास्त वसाहतयोग्य होता. त्यामुळे सजीव सृष्टीचा अवकाशात शोध घेताना ऑक्सिजन हा एकमेव निकष असू शकत नाही, असे त्यांचे मत आहे. थोडक्यात भूगर्भशास्त्राचे संशोधन हे अवकाश विज्ञानाइतकेच महत्त्वाचे आहे हा वेगळा विचार त्यांच्या कामातून मांडला गेला आहे.