शिकाऱ्यांनाच वन्य प्राणी व वनस्पतींचे रक्षण करण्याचे शिक्षण देऊन सन्मामार्गावर आणणारे, निसर्गाच्या रक्षणासाठी तरुणांची प्रशिक्षित फौज उभे करणारे गुवाहाटीचे पर्यावरण संवर्धक बिभूती लहकार यांच्या कामाला अखेर जगाने मान्यता दिली आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर या जागतिक संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. लहकार यांचे काम मानस नॅशनल पार्कमधील गवताळ प्रदेशांच्या संवर्धनाबरोबरच हिमालयाच्या पायथ्याशी तराई भागातील वन्य संपदेच्या रक्षणातही मोठे आहे. मानस नॅशनल पार्क भारत-भूतान सीमेवर आहे, जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याची निवड झाली आहे. एकेकाळी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून धोक्यात असलेल्या मानस नॅशनल पार्कला पुन्हा पूर्वीचेच वैभव प्राप्त करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

निसर्गपुत्राप्रमाणे ते शिकत वैज्ञानिक बनले. सध्या ते अरण्यक या संस्थेत काम करतात. वन्यजीव व माणूस यांचा संघर्ष अधिवास नष्ट झाल्याने टिपेला पोहोचतो, पण दोष वन्यजीवांनाच दिला जातो. लहकार यांच्या मते तुम्ही हत्तींच्या समवेत आनंदाने जगू शकता फक्त त्याची खुबी तुम्हाला कळली पाहिजे. मानस नॅशनल पार्कच्या संरक्षणासाठी त्यांनी ३०० तरुणांना प्रशिक्षण दिले, अनेक शिकाऱ्यांना त्यांनी पर्यावरणाचे रक्षक केले. शंभर युवकांना पर्यावरणस्नेही उपजीविकेचे प्रशिक्षण दिले. निसर्गाचे संवर्धन करताना त्यांनी ऐन बोडो आंदोलनातही तेवढय़ाच हिमतीने काम केले हे विशेष. त्यावेळी अस्थिरतेचा फायदा घेऊन मानस नॅशनल पार्कमध्ये जंगलतोड सुरू होती ती थांबवण्याचे प्रयत्न त्यांनी केले. निसर्गाचे संवर्धन तेथील लोकांशी मैत्री करूनच साध्य करता येते असे त्यांचे मत आहे व संघर्ष न करता त्यांनी ही किमया साधली. १९९९ मध्ये त्यांनी पीएच डी साठी मानस नॅशनल पार्क हा विषय घेतला, पण ही पीएच डी निसर्गाला वाचवणारी ठरली. २००८ मध्ये त्यांना ही पदवी मिळाली पण त्या पदवीपेक्षा फार मोठे काम त्यांनी प्रत्यक्षात केले. हत्तींच्या हल्ल्यांपासून १००० कुटुंबांना वाचवण्यासाठी १४ कि. मी. चे विद्युत कुंपण घालण्याचे काम त्यांच्या देखरेखीखाली झाले. २०१३ मध्ये ते काम पूर्ण झाले तेथे तेव्हापासून एकही हत्ती किंवा माणूस मरण पावलेला नाही. मानस व्याघ्र संवर्धन योजनेसाठी त्यांनी पाहणी केली, त्यांच्या शिफारशी विचारात घेतल्या जात आहेत.

आता ते स्थानिकांसाठी मानस पार्कमध्ये रोपवाटिका तयार करीत आहेत. पर्यायी उपजीविकेसाठी त्यांनी १०० महिलांचा स्वमदत गटही तयार केला. त्यांना विनोदी किंवा थरारक चित्रपट पाहण्याची आवड आहे. आसामी लोकसंगीत व लघुकथा त्यांना आवडतात. प्रवास हा त्यांच्या जीवनाचा एक भागच आहे. मानस पार्कनेच त्यांना शिक्षण दिले, ओळख दिली. पर्यावरण संवर्धनाची गोडी लावली व नमिता ही जीवनातील जोडीदारही दिली. त्यामुळे मानस पार्क हेच त्यांचे सर्वस्व आहे.