डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडय़ातील उच्च शिक्षणाचा पाया रचल्यानंतर त्यावर कळस चढविण्याचे काम पुढील काळात ज्या शिक्षणतज्ज्ञांनी निष्ठेने पार पाडले त्यात प्राचार्य गो. रा. म्हैसेकर यांचे नाव ठळकपणे घ्यावे लागेल. १९५० पासून तब्बल पाच दशके म्हैसेकर शिक्षण क्षेत्राशी निगडित होते. या क्षेत्रात अध्यापन, प्रशासन आणि धोरण या तीन आघाडय़ांवर त्यांनी काम केले आणि सबंध महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली.

हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान शाखेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर म्हैसेकरांनी औरंगाबादेत शिक्षकी पेशा स्वीकारला. पुढे काही वर्षेते प्राध्यापक होते, पण त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीला १९६३ नंतर झळाळी मिळाली. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयामुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची संधी मिळाली. या महाविद्यालयाचे नेतृत्व दीर्घकाळ करताना म्हैसेकरांनी अनेक गरीब, पण होतकरू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले. हा परिपाठ पुढे खासदार झाल्यानंतर तसेच तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविताना त्यांनी सुरू ठेवला. त्यांचे अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात पसरलेले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे त्यांपकी एक!

म्हैसेकर यांच्या व्यक्तिगत जीवनाचा प्रारंभ एका सामाजिक क्रांतीने झाला. त्यांनी १९४८ साली आंतरजातीय आणि तोही एका विधवा महिलेशी विवाह केला. समाजसुधारणेचा प्रारंभ त्यांनी स्वत:च्या घरापासून केला आणि एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला. नंतरच्या काळात त्यांना दिवंगत शंकरराव चव्हाण, श्यामराव कदम अशा दूरदृष्टीच्या नेत्यांचा सहवास आणि पाठिंबा लाभला. ते आरंभापासून काँग्रेस विचारधारेचे पाईक होते. पण जेव्हा जेव्हा मराठवाडय़ाच्या विकासाचा, या विभागाला जे हक्काचे आहे ते मिळण्याचा विषय आला तेव्हा मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून काँग्रेसच्या राज्यकर्त्यांशी संघर्ष करण्यास ते कचरले नाहीत. त्यामुळेच गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव, उद्धवराव पाटील यांसारख्या वेगळ्या विचारसरणीच्या मंडळींशी त्यांचे निकटचे संबंध राहिले. प्राचार्यपद, खासदारकी आणि शेवटी कुलगुरुपद भूषविल्यानंतर म्हैसेकर १९८०च्या दशकात नांदेडला स्थायिक झाले. मागील काही वर्षांपर्यंत ते शैक्षणिक क्षेत्रात सतत कार्यरत  राहिले. नांदेडच्या विद्यापीठाची घडी बसविण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या विषयांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. सततच्या वाचन-चिंतनातून त्यांनी हे साध्य केले. प्रदीर्घ काळ सार्वजनिक जीवनात राहिले तरी ते कोणत्याही वादात अडकले नाहीत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले; पण ‘स्वारातीम विद्यापीठा’ने दिलेली डीलिट ही मानद पदवी त्यांच्या उत्तुंग शैक्षणिक कार्याला मानाचा ‘सलाम’ करणारी ठरली. ९४ वर्षांचे प्रदीर्घ आणि कृतार्थ आयुष्य जगल्यानंतर शुक्रवारी शांतपणे त्यांनी या जगाचा निरोप घेतला.