संरक्षण संशोधन व विकास संस्थेला प्रसिद्ध वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यानंतर चांगले वैज्ञानिक नेतृत्व पुढे आणता आले नाही, अशी टीका नेहमी केली जाते, पण त्याचे उत्तर शोधणे कठीण नाही. समर्पण वृत्तीने काम करणारे लोक कमी असतात. काही वेळा तसे लोक असतील तरी त्यांच्या गुणांना वाव देऊन फुलवणारे कुणी असतेच असे नाही. संरक्षण क्षेत्रातील नामवंत वैज्ञानिक डॉ. जी. सतीश रेड्डी हे मात्र त्याला अपवाद आहेत. क्षेपणास्त्रांच्या दिशादर्शन यंत्रणांच्या संशोधनात त्यांचे नाव आघाडीवर आहे. सध्या ते संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व क्षेपणास्त्र-सामरिक प्रणाली कार्यक्रमाचे महासंचालक आहेत. त्यांना अलीकडेच क्षेपणास्त्र रचना व विकासकामासाठी नॅशनल डिझाइन पुरस्कार जाहीर झाला आहे. दिशादर्शित शस्त्रास्त्र प्रणाली स्वदेशी पातळीवर विकसित करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

सतीश रेड्डी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्य़ात आत्माकुर मंडलातील महीमलोर खेडय़ात एका शेतक री कुटुंबात झाला. हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी या छोटय़ाशा गावात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नेल्लोरच्या व्ही. आर. कॉलेजातून पुढील शिक्षण घेतले. अनंतपूरच्या जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठातून त्यांचे उच्चशिक्षणही पूर्ण झाले. अर्थात त्यांना पुढच्या प्रवासात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासारखे गुरू भेटले. त्यामुळे क्षेपणास्त्र विज्ञानात त्यांची कामगिरी सरस होत गेली. त्याला त्यांच्या समर्पण वृत्तीची जोड होती. ‘कलाम यांना माझ्यातील क्षमता व वैगुण्ये दोन्ही माहिती होती. कुठल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी सज्ज आहे हेही त्यांना कळत होते. त्यांच्या वेळचा काळ आता बदललेला आहे याचेही त्यांना भान होते. त्यामुळेच ते स्वत: काळाबरोबर राहिले व मलाही सहप्रवासी केले. राजाजी मार्गावरील त्यांच्या वाचनालयात दहा क्रमांकाच्या खोलीत त्यांची माझी पहिली भेट झाली. त्यांच्याशी बोलताना त्यांचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील आकर्षण व ते मिळवण्याची जिद्द तर दिसतच होती. त्यांनी मला दिशा दिली व काय करायला पाहिजे तेही सांगितले,’ अशी आठवण रेड्डी सांगतात.

कलाम यांच्यानंतर ‘ज्युनियर मिसाइल मॅन’ असा रेड्डी यांचा लौकिक आहे. त्या काळात कुठलीही समस्या आली की, उत्तरासाठी कलाम यांच्याकडे आशेने पाहात असू; पण आता ते नाहीत याची जाणीव वेळोवेळी होते, असे ते सांगतात. प्रश्नाकडे कसे बघायचे व त्याला लक्ष्य करीत काम कसे करायचे हे सगळे तंत्र सतीश रेड्डी यांनी कलाम यांच्याकडून शिकून घेतले. कलाम यांचा ठसा त्यांच्या कार्यावर आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, राष्ट्रीय धोरणनिश्चिती, विविध क्षेपणास्त्र प्रणाली या क्षेत्रांत त्यांनी पायाभूत काम केले. आता त्यांना जो पुरस्कार मिळाला आहे तो नॅशनल डिझाइन रीसर्च फोरम या संस्थेचा असून तो इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीअर्स या संस्थेकडून दिला जातो. त्यांना यापूर्वी होमी भाभा स्मृती पुरस्कार, डीआरडीओ अग्नी पुरस्कार, तरुण वैज्ञानिक पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रेड्डी यांनी डॉ. कलाम क्षेपणास्त्र संकुलाचे प्रमुख म्हणून निर्णायक भूमिका पार पाडली. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात भारताला स्वयंपूर्णता प्राप्त करून देण्यात त्यांनी मोठे काम केले आहे. लंडनच्या रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ नेव्हिगेशन या संस्थेचे ते पहिले भारतीय फेलो आहेत. रॉयल एरॉनॉटिकल सोसायटीचे ते सदस्य आहेत.

सतीश रेड्डी यांच्यासारख्या वैज्ञानिकांची समर्पण वृत्तीच आपल्या संरक्षणसिद्धतेला आतापर्यंत पुढे नेत आली आहे. त्यांच्या या सन्मानातून आजच्या काळात तरुणाईकडून फारशा पसंत न केल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी शाखेलाही प्रतिष्ठा मिळाली आहे.