16 February 2019

News Flash

डॉ. गणेश वानखेडे

कोळी किंवा त्याने विणलेले जाळे, हा अनेकांसाठी झाडूने झटकण्याचा विषय.

कोळी किंवा त्याने विणलेले जाळे, हा अनेकांसाठी झाडूने झटकण्याचा विषय. याच कोळ्यांवर संशोधन करण्यात आपले आयुष्य खर्ची घातलेले डॉ. गणेश वानखेडे यांचे नुकतेच झालेले निधन संशोधन क्षेत्रासाठी मोठी हानी आहे. अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख असलेले वानखेडे मूळचे जळगावचे. नोकरीच्या निमित्ताने अमरावतीत आल्यानंतर त्यांना मेळघाटचे समृद्ध जंगल व सातपुडय़ाच्या पर्वतरांगांच्या निरीक्षणाचा छंद जडला. अभ्यास व संशोधनासाठी त्यांनी कोळी हा विषय निवडला. निसर्गचक्रातील महत्त्वाचा, पण दुर्लक्षित असलेल्या या कोळ्याच्या संशोधनात ते अखेपर्यंत रमले. त्यांनी देशभर फिरून कोळ्यांच्या सहाशे प्रजाती शोधून काढल्या. त्यातील १०६ प्रजातींचा शोध भारतात पहिल्यांदा लावण्याचे श्रेय डॉ. वानखेडे यांच्याकडे जाते.

हे संशोधन सुरू असतानाच त्यांनी झुऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या नामवंत संस्थेकडे उपलब्ध असलेल्या कोळ्यांवरील संशोधनपर पुस्तकांचा अभ्यास केला. त्यात त्यांना अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यांनी सतत पाठपुरावा करून या त्रुटी दूर करण्यास संस्थेला भाग पाडले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन संस्थेने २००३ मध्ये त्यांना सुवर्णपदक देऊन गौरवले. त्यांनी आचार्य ही पदवी कोळ्यांवर संशोधन प्रबंध लिहूनच मिळवली. कोळिष्टक विणणारे कोळी नेमके कसे असतात, त्यांचे जीवन व कुटुंबपद्धती कशी असते, यावर त्यांचा दांडगा अभ्यास होता. डॉ. वानखेडे यांनी या, तसेच प्राणिशास्त्रावर एकूण १३ पुस्तके लिहिली. ते अतिशय विद्यार्थिप्रिय शिक्षक होते. त्यांनी स्वत:च्या घरीच प्रयोगशाळा तयार केली होती. केवळ देशातीलच नाही, तर विदेशातील अनेक विद्यार्थी खास अमरावतीला येऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करायचे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे ते सदस्य होते. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सातपुडा फाऊंडेशनचे ते पदाधिकारी होते. काही वर्षांपूर्वी ताडोबातील एक वाघ सातत्याने मानवावर हल्ले करीत होता. त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीत काम करताना डॉ. वानखेडे यांनी हा वाघ एका डोळ्याने अंध झाला असून कोळशामुळे हे अंधत्व आले आहे व त्यामुळेच तो बिथरला आहे, असे संशोधनातून सिद्ध केले होते. त्यांच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आल्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी अमरावतीत कोळी संशोधकांचे एक संमेलन भरवले. यात अनेक देशांतील संशोधक सहभागी झाले होते. अध्यापनाचे काम आटोपले की, विद्यार्थ्यांना घेऊन थेट जंगलाची वाट धरणारे वानखेडे चालताबोलता ग्रंथ म्हणूनच ओळखले जायचे. विद्यार्थ्यांच्या वर्तुळात ‘स्पायडरमॅन’ अशी त्यांची ओळख होती. दोन वर्षांपूर्वी रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतरही त्यांच्यातील संशोधक वृत्तीने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. अखेपर्यंत जंगल व प्रयोगशाळा यात रमणाऱ्या या संशोधकाच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला आहे.

First Published on July 8, 2016 3:40 am

Web Title: dr ganesh wankhede