मधुमेहाचे जगातील प्रमाण फारसे नसताना इन्शुलिनला आपल्या शरीरात प्रतिरोध झाला तर त्यामुळे टाइप २ मधुमेह होतो व इतर अनेक रोग उद्भवतात हे सप्रमाण सिद्ध करण्यात आले होते, त्यामुळे या रोगावरील उपचारात मोठी प्रगती होऊ  शकली. टाइप २ मधुमेहाचे वरील कारण सर्वप्रथम सांगणारे जेराल्ड रीव्हन यांचे नुकतेच निधन झाले. ते स्टॅनफर्डचे खंदे वारसदार होते. इन्शुलिनला शरीरात मिळणारा प्रतिसाद कमी होण्यातच अनेक गोष्टी दडलेल्या आहेत असे त्यांनी जेव्हा सांगितले, तेव्हा त्या काळी त्याला बराच विरोध झाला होता. पण त्यांना विरोध करणारे नंतर चुकीचे ठरले.

१९८८ मध्ये त्यांनी इन्शुलिन प्रतिरोध व चयापचयातील अनेक दोष यांचा संबंध जोडून दाखवला; यातून हृदयविकारही बळावतो हे त्यांनी सांगितले. या सगळ्या विकारसमुच्चयाला त्यांनी ‘सिंड्रोम एक्स’ असे नाव दिले होते.  १९५० मध्ये त्यांनी संशोधक म्हणून काम सुरू केले. इन्शुलिनच्या अभावी होणारा मधुमेह एवढा एकच प्रकार तेव्हा माहिती होता, पण ते त्यापलीकडे गेले. सप्रमाण व पुरावे असलेले संशोधन ते मान्य करीत असत. १९८८ मध्ये त्यांनी सिंड्रोम एक्सची संकल्पना मांडली ती एका व्याख्यानात. त्यात रक्तदाब, रक्तशर्करा व अनियमित एचडीएल कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइडची रक्तातील पातळी यांचा समावेश होता. एकू ण आठशे शोधनिबंध त्यांच्या नावावर होते. आणखी दोन त्यांनी तयार केले होते ,पण त्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे ‘सिंड्रोम एक्स’ हे पुस्तक विशेष गाजले व सिंड्रोम एक्सचा हृदयाच्या आरोग्यावर कसा अनिष्ट परिणाम होतो हे नंतर दिसून आले. त्यांचा जन्म इंडियानातील गॅरी या गावचा. ते लहानाचे मोठे झाले ते क्लीव्हलँडमध्ये. तेथूनच त्यांना बेसबॉलची आवडही निर्माण झाली होती. ते व नंतर त्यांची मुलेही शैक्षणिक वातावरणात वाढली. जेवणाच्या टेबलवर त्यांच्या मुलांशी गप्पा विज्ञानावरच असत. त्यांचा मुलगाही एमडी (संप्रेरकतज्ज्ञ) झाला, अगदी वडिलांप्रमाणेच. ब्रॉडवेची नाटके, जॅझ मैफिली, साहित्य यांची त्यांना आवड होती. हेमिंग्वेच्या शोधात ते एकदा क्युबाला गेले होते. शिकागो विद्यापीठात ते शिकले, नंतर मिशिगन विद्यापीठातून प्रशिक्षण घेतले व स्टॅनफर्डमध्ये प्राध्यापक झाले. मिडलटन पुरस्कार, बँटिंग मेडल, फ्रेड कॉनरॉड कॉख पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. माणसाच्या शरीरात साखरेच्या रूपात ग्लुकोज आल्यानंतर इन्शुलिन नेमका त्यावर कसा प्रभाव टाकते हे पायाभूत संशोधन त्यांनी केले नसते तर टाइप २ च्या मधुमेहातील उपचारात आज आहे तितकीही प्रगती झाली नसती, त्यामुळे त्यांचे हे संशोधन मानवजातीला वरदान देऊ न गेले यात शंका नाही.

((   डॉ. जेराल्ड रीव्हन   ))