18 October 2019

News Flash

डॉ. गिरीश मिश्र

डॉ. मिश्र  हे लोककेंद्री अर्थकारणाचा पुरस्कार करीत राहिले. उदारीकरणाचा एक महत्त्वाचा टीकाकार त्यांच्या निधनाने हरपला आहे.

डॉ. गिरीश मिश्र

अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र यांचा आंतरशाखीय संबंध आपल्या विद्यापीठांमध्ये गेल्या काही वर्षांत प्रस्थापित झाला असला, तरी वास्तवात हा संबंध अनादिकाळापासून आहेच. तो नेमका जाणण्याची आणि उलगडून दाखवण्याची हातोटी ‘आर्थिक इतिहास’ या विषयात डॉक्टरेट केलेल्या डॉ. गिरीश मिश्र यांच्याकडे होती.  इंग्रजी व हिंदीत त्यांनी २० पुस्तके लिहिली, नेहरूकाळातील व नंतरच्या आर्थिक धोरणांचे मूल्यमापन केले आणि दिल्ली विद्यापीठातील किरोडीमल महाविद्यालयात प्राध्यापैकीही केली. विद्यापीठीय परिभाषेपेक्षा लोकांना विषय समजावून सांगणारे लिखाण करण्यावर भर देणारे डॉ. गिरीश मिश्र काही दिवसांपूर्वी निवर्तले.

ते मूळचे बिहारचे. गांधीजींनी नीळ-कामगारांचा सत्याग्रह (१९१६) जेथे घडवून भारतीय आर्थिक इतिहासाला नवी दिशा दिली, त्या चंपारण्य जिल्ह्यातील गांधीविचारांचे स्वातंत्र्यसैनिक पं. बिभूती मिश्र यांचे कनिष्ठ पुत्र म्हणून १९३९ साली गिरीश जन्मले. शिक्षण प्रथम बिहारमध्ये आणि १९५२ पासून (१९७७ पर्यंत), वडील खासदार झाल्यामुळे दिल्लीत. पण महाविद्यालयीन वयातच वडिलांच्या काँग्रेस-विचारधारेपासून निराळी, डावी विचारधारा गिरीश यांनी आपली मानली. अर्थात, नेहरूवादावर सोविएत रशियाचा प्रभाव असल्याने या विचारधारांचे शत्रुत्व कधी नव्हतेच, इंदिरा-काळापर्यंतही त्या समांतरच होत्या. हे डाव्यांना खपले नाही. पार्टीचे सदस्यपद डॉ. गिरीश यांच्याकडून काढून घेण्यात आले. वडिलांपासून ते दुरावा राखू शकले होते, त्यांच्या खासदारकीची प्रभा अजिबात अंगावर येऊ नये याची काळजीही घेत होते, परंतु काँग्रेसी समाजवादापासून दूर राहू शकत नव्हते.  वडिलांच्या मृत्यूनंतर, ‘डाव्यांनी काँग्रेसशी सहकार्य केले पाहिजे,’ या मताचा ते उघड पुरस्कार करू लागले.

अर्थात लोकांना, त्यातही गरीब आणि सर्वहारांना, केंद्रस्थानी मानूनच अर्थकारण- राजकारण यांचा विचार करण्याचा साम्यवादी संस्कार डॉ. मिश्र यांनी कधी पुसू दिला नाही. ‘सोशिऑलॉजी अँड इकॉनॉमिक्स ऑफ कास्टिझम इन इंडिया’सारखे जमिनीवरील वास्तवाच्या सखोल अभ्यासातून जातीचा अर्थकारणाशी संबंध तपासणारे ग्रंथरूप संशोधन असो वा ‘सफेदपोशों के अपराध’ सारखे लोकज्ञान वाढविणारे पुस्तक; सहा परदेशी चर्चासत्रांसह अनेक सत्रांमध्ये वाचलेले २० हून अधिक शोधनिबंध असोत किंवा ‘द हिंदू’, ‘इंडियन एक्स्प्रेस’सह अन्य प्रख्यात इंग्रजी व काही हिंदी दैनिकांत केलेले प्रासंगिक लिखाण.. डॉ. मिश्र  हे लोककेंद्री अर्थकारणाचा पुरस्कार करीत राहिले. उदारीकरणाचा एक महत्त्वाचा टीकाकार त्यांच्या निधनाने हरपला आहे.

First Published on May 7, 2019 12:10 am

Web Title: dr girish mishra profile