औषधनिर्माणशास्त्र हा आपल्याकडे तसा दुर्लक्षिला गेलेला विषय. या विषयात ज्यांनी पायाभूत काम केले अशांपैकी एक म्हणजे डॉ. हेमचंद्र टिपणीस. त्यांच्या निधनाने आपल्या देशाला या क्षेत्रात नवी दिशा देणारा एक मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतात औषधनिर्माणशास्त्राला ज्यांनी नाव मिळवून दिले त्यात टिपणीस हे प्रमुख होते.
सर्वसामान्य कुटुंबात ७ जुलै १९३३ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी तंत्रज्ञान या विषयात बीएस्सी व एमएस्सी पदव्या घेतल्यानंतर कॅलिफोर्निया स्कूल ऑफ फार्मसी या संस्थेतून ते एमएस (मास्टर ऑफ सायन्स) झाले व नेब्रास्का विद्यापीठातून डॉक्टरेट केली. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी या संस्थेत त्यांनी प्रपाठक म्हणून कारकीर्द सुरू केली. नंतर ते बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी या संस्थेत १९७१ ते १९९५ या काळात प्राचार्य होते. त्यांनी औषधनिर्माण क्षेत्रातील उद्योगांनी भागीदारीत काम करून मोठे काम उभे केले पाहिजे, असे मत नेहमीच व्यक्त केले होते. कारण औषधे तयार करण्याच्या प्रक्रियेत कोटय़वधींची गुंतवणूक असते. औषधांच्या चाचण्या व प्रत्यक्षात औषधाचे शरीरावर होणारे परिणाम किंबहुना ते नेमके कसे काम करते या बाबींना औषधनिर्माण क्षेत्रात फार महत्त्व असते. औषधांच्या मानवी स्वयंसेवकांवरील चाचण्यांत त्यांनी मूलभूत असे शोधनिबंध लिहिलेले आहेत. त्यांच्या या संशोधनामुळेच औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यात ‘शेडय़ुल वाय’ या नवीन औषध गटाचा समावेश झाला.
औषधनिर्माणात प्रत्यक्ष शैक्षणिक संस्था व उद्योग यांचा समन्वय असला पाहिजे असे त्यांचे मत होते. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे प्राचार्य असताना केवळ त्यांनी शैक्षणिक प्रमुख म्हणून काम केले असे नाही तर या महाविद्यालयास आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून दिले, त्यासाठी त्यांनी अनेक मोठय़ा प्रकल्पांत विविध औषध कंपन्यांशी महाविद्यालयाची भागीदारी असेल याची दक्षता घेतली होती. २००७ मध्ये ते इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचे अध्यक्ष झाले. इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे ते सदस्यही होते. कम्युनिटी फार्मसी, हॉस्पिटल फार्मसी, क्लिनिकल फार्मसी, प्रिन्सिपल्स अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन्स ऑफ बायोफार्मास्युटिकल्स अ‍ॅण्ड फार्माकोजेनेटिक्स, इनऑरगॅनिक फार्मास्युटिकल केमिस्ट्री अशा अनेक विषयांवर त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
आंतरराष्ट्रीय नियमनाच्या गरजा ओळखून त्यांनी भारतीय औषधनिर्माणशास्त्रास पुढे नेले व अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाची दारे भारतीय औषध निर्मात्यांना खुली करून दिली. त्यांनी किमान ३५ विद्यार्थ्यांना डॉक्टरेटसाठी तर १०० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीसाठी मार्गदर्शन केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr hemchandra tipnis
First published on: 11-06-2016 at 03:21 IST