स्त्रियांमधील कर्करोगाचे प्रमाण जीवनशैली व जनुकीय कारणांमुळे वाढत आहे. इ.स. २०२० मधील आकडेवारीनुसार, भारतात दर २९ महिलांत एकीला स्तनाच्या कर्करोगाची शक्यता असते. दर चार मिनिटाला एका महिलेला कर्करोग झाल्याचे निदान होते. या कर्करोगाचे प्रमाण १४ टक्के आहे. या कर्करोगावर मात करणाऱ्या डॉक्टरांपैकी एक म्हणजे डॉ. जाजिनी वर्गीस. त्यांना अलीकडेच एका स्वयंसेवी संस्थेचा आउटस्टँडिंग यंग पर्सन ऑफ दि इयर २०२० हा पुरस्कार मिळाला. भारतीय वंशाच्या जाजिनी यांना यापूर्वीही अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले होते, पण पुरस्कारांपेक्षा या क्षेत्रात त्यांनी केलेले काम मोठे आहे. त्यांची ओळख म्हणजे स्तनाच्या कर्करोगाचे निदान व नंतरची शस्त्रक्रिया यात त्या तज्ज्ञ आहेत. वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी त्यांनी अनेक कर्करोगग्रस्त महिलांचे जीवन सुखकर केले आहे. स्तनाच्या कर्करोगात काहीवेळा  स्तन काढून टाकल्याने स्त्रियांना मोठा मानसिक धक्का बसतो त्यावर मात करण्यात त्यांनी मदत केली. कर्करोगाशी लढण्याची स्त्रियांची जिद्द वाढवण्यास त्यांनी पाठबळ दिले आहे. लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या जाजिनी  या मूळ केरळमधील मट्टम हरिपादच्या. त्यांचे आईवडील जॉर्ज व जॉली वर्गीस अजूनही तेथे राहतात. ब्रिटनमध्ये आल्यानंतर त्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्समधून शल्यविशारद झाल्या. युनिव्हर्सिटी कॉलेज  लंडन येथे त्या ‘प्लास्टिक सर्जरी’च्या प्राध्यापक व परीक्षकही आहेत. भारतातून वैद्यकक्षेत्रात पदवी घेतल्यानंतर त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाची विद्यावृत्ती मिळाली. त्यांच्या अभ्यासाचा विषय होता, ‘स्तनाच्या कर्करोगाचे जनुकशास्त्र’.  स्तनाच्या कर्करोगाशी कुठले जनुक संबंधित असतात हे त्यांनी शोधून काढले. हार्वर्ड विद्यापीठ व मेयो क्लिनिक यांच्या संशोधन पथकासह त्यांनी ‘झेडएनएफ ३६५’ या कर्करोगकारक जनुकाचा विशेष अभ्यास केला. त्यांचा हा शोधनिबंध ‘नेचर जेनेटिक्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. कर्करोगनिदान जर नंतरच्या टप्प्यात झाले तर स्तन काढून टाकावे लागतात, त्यावर वर्गीज यांनी ऑन्कोप्लास्टिक शस्त्रक्रियेचा पर्याय शोधला. ‘ईएमईटी शिष्यवृत्ती’द्वारे भारतातील ग्रामीण भागातही डॉक्टर्स जावेत यासाठी त्यांनी १७ वर्षांपूर्वी प्रयत्न केले; त्यामुळे महिला डॉक्टरांना ग्रामीण भागात दोन वर्षे आंतरवासीयता करण्यास प्रोत्साहन मिळाले.