28 February 2021

News Flash

डॉ. कल्याण काळे

उस्मानाबादच्या परांडय़ात १९३७ साली डॉ. काळे यांचा जन्म झाला.

डॉ. कल्याण काळे

 

इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा प्रसार होऊ लागला, मराठी ‘डाऊनमार्केट’ वाटू लागली, मराठीचे राजकारणही भरकटले, हे सारे होण्याच्या काळात महाराष्ट्रात ‘भाषाविज्ञान’ या विषयाची पायाभरणी करणाऱ्या तपस्वी अभ्यासकांपैकी एक असलेले डॉ. कल्याण वासुदेव काळे यांची निधनवार्ता गत आठवडय़ात आली; तेव्हा भाषाविज्ञानाच्या, भाषिक संस्कृतीच्या अभ्यासक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वर्तुळातून संन्यस्त वृत्तीचा संशोधक हरपल्याची भावना व्यक्त झाली. डॉ. काळे यांची प्रसिद्धीपराङ्मुख अभ्यासकीय वाटचाल पाहिली, तर याचा प्रत्यय यावा.

उस्मानाबादच्या परांडय़ात १९३७ साली डॉ. काळे यांचा जन्म झाला. तिथे १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेलेल्या हंसराजस्वामी या संतकवीचा त्यांच्यावर प्रभाव होता. वेदान्तावर जीवननिष्ठा असणाऱ्या हंसराजस्वामींनी परांडय़ात हंससंप्रदाय सुरू केला होता, तब्बल १६ ग्रंथही लिहिले होते. यापैकी दहा ग्रंथ डॉ. काळे यांनी संपादित केलेच, शिवाय ‘परांडय़ाचे हंसराजस्वामी’ हे चरित्रपर पुस्तक लिहून त्यांच्या तत्त्वज्ञानाची ओळखही करून दिली. मराठी संतसाहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. ‘संतसाहित्य : अभ्यासाच्या काही दिशा’ या त्यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचा यासंदर्भात उल्लेख करता येईल. साठच्या दशकारंभी संस्कृत भाषाविज्ञानात त्यांनी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले, पण नंतरही वेदान्ताबद्दलचे संस्कृत साहित्य हा त्यांच्या आस्थेचा विषय राहिला. आधी बार्शी, मग नंदुरबार आणि नंतर म्हैसूरच्या भारतीय भाषा संस्थानच्या पुण्यातील पश्चिम भाषा विभागीय केंद्रात काही काळ अध्यापनकार्य करून ते पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात रुजू झाले अन् विभागप्रमुख होऊन १९९७ साली निवृत्त झाले.

याच काळात भाषाविज्ञान हा विषय विद्यापीठीय पातळीवर रुजवण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. हा विषय नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट झाला, तेव्हा विद्यार्थी-प्राध्यापकांसाठी भाषाशास्त्राचे पहिले रीडर त्यांनीच संपादित केले. डॉ. अंजली सोमण यांच्यासह त्यांनी संपादित केलेली ‘आधुनिक भाषाविज्ञान’ आणि ‘वर्णनात्मक भाषाविज्ञान’ ही पुस्तके असोत वा सहकारी द. दि. पुंडे यांच्यासह लिहिलेले ‘व्यावहारिक मराठी’ किंवा अ-मराठी विद्यार्थ्यांसाठी सिद्ध केलेले ‘लर्निग मराठी’ हे पुस्तक अथवा सुवाच्य, वळणदार मराठीलेखन कसे करावे हे शिकविणारी ‘मराठी अक्षरलेखन’ ही पुस्तिका असो, डॉ. काळे यांची अभ्यासू तरी सुबोध आणि आग्रही तरी लवचीक, स्वागतशील वृत्ती त्यांतून दिसून येते. भाषा शुद्ध वा अशुद्ध नसते, अशी त्यांची अभ्यासातून सिद्ध झालेली धारणा होती. म्हणूनच ‘शुद्धलेखन’ऐवजी ‘लेखनसंकेत’ हा शब्द ते वापरत. एकुणात, भाषा म्हणजे नुसती चिन्हे नव्हेत; ‘भाषा आणि जीवन’ यांचा संबंधही ध्यानात घ्यायला हवा, ही जाणीव असणारा भाषाअभ्यासक त्यांच्या निधनाने आपण गमावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2021 12:01 am

Web Title: dr kalyan kale profile abn 97
Next Stories
1 सुनील कुमार
2 शरू रांगणेकर
3 व्ही. शांता
Just Now!
X