21 September 2018

News Flash

डॉ. ललिताम्बिका

ललिताम्बिका यांना २००१ मध्ये इस्रोचे सुवर्णपदक  मिळाले

डॉ. ललिताम्बिका

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १५ ऑगस्ट २०१२ रोजी मंगळ मोहिमेची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत म्हणजे ५ नोव्हेंबर २०१३ रोजी ती मोहीम भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने फत्ते केली! वैज्ञानिकांना एकदा लक्ष्य ठरवून दिले तर ते किती कमी वेळात, किती अचूकतेने काम करू शकतात याचा तो वस्तुपाठ होता. आता यंदाच्या १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना अवकाशात पाठवण्याच्या मोहिमेची घोषणा केली आहे. मानवाला अवकाशात म्हणजे आपल्या पृथ्वीबाहेरच्या कक्षेत नेण्याची ही मोहीम आहे. ती यशस्वी झाल्यास रशिया, अमेरिका, चीन यांच्यानंतर मानवाला अवकाशात पाठवणारा भारत हा चौथा देश ठरेल. या अवकाश मोहिमेची धुरा इस्रोच्या नियंत्रण प्रणाली अभियंता डॉ. ललिताम्बिका यांच्यावर सोपवण्यात आली आहे. इस्रोत अनेक महिला वैज्ञानिक आहेत, त्यांनी वेगवेगळ्या मोहिमांत काम केले असले तरी संपूर्ण मोहिमचे नेतृत्व प्रथमच महिला वैज्ञानिकाला मिळाले आहे. मानवी अवकाश मोहीम ही वास्तविक खूप अवघड व कालहरण करणारी आहे. सन २०२२ पर्यंत मानवाला पृथ्वीबाहेर पाठवण्याच्या या मोहिमेसाठी ९००० कोटी खर्च येणार आहे.

HOT DEALS
  • Sony Xperia XA Dual 16 GB (White)
    ₹ 15940 MRP ₹ 18990 -16%
    ₹1594 Cashback
  • Lenovo Phab 2 Plus 32GB Gunmetal Grey
    ₹ 17999 MRP ₹ 17999 -0%

डॉ. व्ही. आर. ललिताम्बिका यांनी तीस वर्षे इस्रोत काम केले असून, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक, भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक, स्वदेशी स्पेस शटल अशा अनेक मोहिमांत त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्या केरळमध्ये शिकलेल्या असून त्यांना दोन मुले आहेत. संसार करतानाच त्यांनी इस्रोच्या अवकाश मोहिमांचीही जबाबदारी लीलया पार पाडली आहे. नियंत्रण अभियांत्रिकीत पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर १९८८ मध्ये त्यांनी तिरुवनंतपुरमच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथून कामास सुरुवात केली. प्रक्षेपकांचे इंधन, त्यांची रचना, स्वयंचलित नियंत्रण हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख भाग आहे. इस्रोत त्या समाधानी आहेत, कारण येथे अगदी कनिष्ठांना त्यांच्या संकल्पना मांडण्याची संधी दिली जाते. त्यात कुणाचा अहंगंड आडवा येत नाही, सांघिक कार्याने कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते हे इस्रोने दाखवून दिले आहे. मानवी अवकाश मोहीम ही आव्हानात्मक आहे यात शंका नाही, असे ललिताम्बिका यांनी सांगितले.

यापूर्वी इस्रोने एकाच वेळी १०४ उपग्रह सोडले, त्यातही त्यांनी मोठी भूमिका पार पाडली होती. ललिताम्बिका यांना २००१ मध्ये इस्रोचे सुवर्णपदक  मिळाले असून, २०१३ मध्ये इस्रोचा उत्कृष्टता पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या या निवडीने सर्वच संशोधन क्षेत्रातील महिलांचे मनोबल उंचावेल यात  शंका नाही.

First Published on August 22, 2018 1:01 am

Web Title: dr lalithambika profile