श्रीपेरुम्बदूर येथे १९९१ साली एलटीटीईने केलेल्या बॉम्बस्फोटात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे विखरून पडले. त्यांच्या छिन्नविच्छिन्न मृतदेहाची ओळख कशी पटवायची, असा प्रश्न आला तेव्हा देशातील एका नामांकित जनुक वैज्ञानिकाने दिलेल्या सल्ल्यानुसार प्रियंका गांधी यांच्या नखांचे डीएनए नमुने घेऊन राजीव यांच्या मृतदेहाची ओळख पटली. हा सल्ला देणारे वैज्ञानिक होते, डॉ. लालजी सिंह. भारतात डीएनए फिंगर पिंट्रिंगचे तंत्रज्ञान विकसित करून ते न्यायवैद्यक शाखेत वापरण्यास सुरुवात होण्यामागे डॉ. सिंह यांचा वाटा सिंहाचाच. त्यांच्या निधनाने या तंत्रज्ञानाचा जनक काळाच्या पडद्याआड गेला आहे.

डीएनए फिंगर पिंट्रिंग तंत्रज्ञान १९८८ मध्ये त्यांनी भारतातही कामी आणले. त्यानंतर दिल्लीतील नैना साहनी तंदूरकांड, उत्तर प्रदेशातील मधुमिता हत्याकांड, प्रियदर्शिनी मट्टू खून प्रकरण यांसह अनेक प्रकरणांत मृतांची व आरोपींची ओळख पटवण्यासाठी त्यांचे हे तंत्रज्ञान वापरले गेले. या तंत्रज्ञानामुळे गुन्हय़ांच्या तपासाला अतिशय निर्णायक अशी कलाटणी मिळाली. याच तंत्रज्ञानातून जनुकीय रोगांचे कोडेही उलगडता येते. जुन्या काळात जनुकीय रोगांवर उपचार शक्य नव्हते, पण आता सदोष जनुक काढून त्या रोगाचे मूळच मिटवता येते. ही डीएनएच्या आधारे रोगनिदानाची पद्धतीही त्यांनी भारतात विकसित केली होती.

कलवारी (जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) येथे जन्मलेल्या लालजींचे वडील सरपंच होते. या छोटय़ाशा गावात जन्मलेले लालजी ग्रामीण पाश्र्वभूमी घेऊनच पुढे गेले असले तरी त्यांनी मर्यादित साधनसामग्रीत यशस्वी वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ म्हणून नाव कमावले. त्यांचे प्राथमिक शिक्षण प्रतापगंज येथील शेरवा कॉलेजमध्ये झाले. बनारस हिंदू विश्वविद्यालयातून त्यांनी जैवतंत्रज्ञानात पदवी व पदव्युत्तर पदवी सुवर्णपदकासह घेतली. पुढचे शिक्षण एडिनबर्ग विद्यापीठातून घेताना त्यांनी डीएनए फिंगर प्रिंटिंग तंत्रज्ञानातील संशोधन सुरू केले. परदेशात संशोधनाची पूर्ण संधी असतानाही देशात परतून १९७७ ते १९८७ असा प्रदीर्घ काळ त्यांनी डीएनए फिंगर पिंट्रिंग तंत्रज्ञान विकसित करण्यात घालवला. रेशमाच्या किडय़ांचे जनुकीय विश्लेषण, मानवी जिनोम व प्राचीन डीएनएचा अभ्यास, वन्यजीव संरक्षण असे त्यांचे आवडीचे विषय होते. त्यांनी तीनशेहून अधिक शोधनिबंध लिहिले. १९७४ मध्ये त्यांना युवा संशोधक पुरस्कार मिळाला. त्यानंतर रॅनबक्सी पुरस्कार, भटनागर पुरस्कार व पद्मश्री असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. हैदराबादची सेंटर फॉर डीएनए फिंगर पिंट्रिंग अ‍ॅण्ड डायग्नॉस्टिक्स व सेंटर फॉर सेल्युलर मॉलेक्युलर बायॉलॉजी या संस्था उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बनारस हिंदू विश्वविद्यालयात कुलगुरू म्हणून काम करताना ते केवळ एक रुपया नाममात्र वेतन घेत होते! याच विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी ३६० खाटांचे आपत्कालीन उपचार केंद्र तर सुरू केलेच, शिवाय अस्थिमज्जा रोपण केंद्र सुरू करण्यातही त्यांचा पुढाकार होता. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सायबर वाचनालयाची सुविधा २४ तास सुरू केली, पण त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी मुले तेथे पोर्न फिल्म बघतात असे सांगून ती बंद केली. मग ही वाचनालयाची सुविधा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले होते.

त्यांनी त्यांच्या छोटय़ाशा गावात २००१ मध्ये राहुल कॉलेज व नंतर अतिशय उच्च तंत्रज्ञानावर आधारित जिनोम फाऊंडेशन या संस्था स्थापन केल्या. त्यांच्या रूपाने एक नि:स्वार्थी प्राध्यापक, जनुकशास्त्रज्ञ आपण गमावला, पण भारतातील जनुकशास्त्राच्या इतिहासात त्यांना अग्रमान राहील यात शंका नाही.