१९६८ मधील एप्रिल-मे महिना आठवला तर त्या वेळी पंजाबमधील मोगा व खन्ना येथील मंडईत गव्हाच्या सोनसळी राशी सर्वाचे लक्ष वेधून घेत होत्या. स्वातंत्र्योत्तर काळात लोकसंख्या वाढत गेली, पण अन्नधान्याचे उत्पादन वाढत नव्हते. त्यासाठी गव्हाच्या संकरित वाणांची मदत घेऊन भारताने गहू उत्पादनात क्रांती केली. नव्या वाणांसह, खते व कीडनाशकांचा वापर यांचाही यात समावेश होता. अन्न सुरक्षेसाठीच्या हरितक्रांतीतील शिलेदार असलेले डॉ. एम. व्ही. राव यांच्या निधनाने उत्तम कृषी वैज्ञानिक आपण गमावला आहे.
त्या वेळी पंजाब हा गव्हाचे कोठार बनला, गव्हाचे वार्षिक उत्पादन १.२ कोटींवरून १.७ कोटी टन झाले होते. ही क्रांती गहूच नव्हे तर तांदळाच्या उत्पादनातही झाली होती. राव यांनी मेक्सिकोतील गव्हाच्या निवडक प्रजाती भारतात आणून गहू उत्पादन वाढवले. त्यांचा जन्म आंध्रातील पश्चिम गोदावरी जिल्ह्य़ातील नरसापूरमचा. ते शेतकरी कुटुंबात जन्माला आले. अमेरिकेत परडय़ू विद्यापीठातून स्नातकोत्तर पदवी घेतल्यानंतर १९६० मध्ये त्यांनी कृषी विषयात पीएच.डी. केली व नंतर देशाची कृषी व्यवस्था सुधारण्यासाठी भारतात परत आले. भारतीय कृषी संशोधन परिषद व इतर संस्थांत त्यांनी मानाची पदे भूषवली. त्यांना प्रतिष्ठेचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार, लिंकर्स पुरस्कार व पद्मश्री नागरी सन्मान मिळाला होता. १९६१-६३च्या सुमारास डॉ. राव यांनी नोरिन या बटू जनुकाचा समावेश असलेले गव्हाचे वाण तयार केले होते. गव्हावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापन डॉ. राव, माथुर व कोहली या त्रिमूर्तीने भारतीय कृषी संशोधन परिषदेत असताना केले होते. विशेष म्हणजे राव यांनी स्वामिनाथन व नॉर्मन बोरलॉग यांच्याबरोबर काम करताना लेरमा रोजो, सोनोरो व मायो या गव्हाच्या नव्या प्रजाती तयार करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. तेलबियात भारत स्वयंपूर्ण नाही हे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८५ ते ९० या काळात ओळखले होते त्यासाठी त्यांनी खाद्यतेलात देशाला स्वयंपूर्ण करण्याच्या कार्यक्रमाचे नेतृत्व डॉ. राव यांच्यावर सोपवले होते. व्यक्तिगत जीवनात त्यांची शिस्त वाखाणण्यासारखी होती. कनिष्ठ वैज्ञानिकांना त्यांनी सतत प्रेरणा देऊन नवी पिढी घडवली. कृषी विद्यापीठातील संशोधन, शिक्षण व पूरक सुविधा यांचा समन्वय असला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते, पण ते कुणी गांभीर्याने घेतले नाही व त्याच चुका आपण आजही करीत आहोत. राव यांनी जागतिक बँकेत कृषितज्ज्ञ, जागतिक अन्न व कृषी संघटनेचे गहू सल्लागार समिती सदस्य, आचार्य एन. जी. रंगा विद्यापीठाचे कुलगुरू, राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमीचे संचालक, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेचे संचालक अशा पदांवर काम केले.
किसान मेळावे आयोजित करून त्यांनी शेतकरी व प्रत्यक्ष कृषी संशोधन यातील दरी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. नोव्हेंबर २०१५ मध्ये हरितक्रांतीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्यांचा सत्कारही करण्यात आला होता.