28 February 2021

News Flash

डॉ. मानवेंद्र काचोळे

डॉ. काचोळे यांची ही कळकळ आणि अभ्यास पाहूनच शरद जोशी यांनी त्यांच्या खांद्यावर ‘स्वतंत्र भारत पक्षा’च्या अध्यक्षपदाची धुरा दिली होती

डॉ. मानवेंद्र काचोळे

 

संघटन कोणतेही असो, बौद्धिक स्तरावरचा ऐवज जमवणारी, त्याची रचना करून देणारी माणसे लागतातच. आधी युवक क्रांती दलात आणि नंतर शरद जोशी यांच्यासह काम करताना स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या चळवळीला बौद्धिक चालना देणारे व्यक्तिमत्त्व अशी मानवेंद्र काचोळे यांची ओळख. काचोळे यांचा जन्म १९५३ सालचा. वडील शिक्षक, विचारांनी रॉयवादी. त्या प्रभावातूनच मानवेंद्र हे नाव. सुरुवातीला गांधी आणि विनोबांच्या विचारांचा प्रभाव मानवेंद्र काचोळे यांच्यावर होता. पुढे मराठवाडा विकास आंदोलनात आणि युक्रांदमध्ये सक्रिय झाले, पण तेथे काम करताना ते कधी रूढार्थाने ‘कम्युनिस्ट’ झाले नाहीत. प्रस्थापित व्यवस्थेविरोधातील मांडणी करीत उत्तर शोधताना मूल्य, साधनशुचिता विचारात घेणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधित्व करत राहिले. प्रगल्भ सामाजिक जाणिवांसह जीवरसायनशास्त्रातील संशोधनाची आवश्यकता आणि संशोधनाची गरज व कार्यपद्धती यांवर काचोळे यांनी काम केले. यातून त्यांनी आयआयटीमधील शिक्षण संशोधनापासून कसे दूर जात आहे, याबाबत एक जनहित याचिकाही दाखल केली होती. संशोधन आणि संशोधक वाढायला हवेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉ. मानवेंद्र काचोळे यांचा संपर्क नंतर शरद जोशी यांच्याशी आला, तो डंकेल प्रस्तावाच्या वेळी. तत्पूर्वी ते जर्मनीत संशोधनासाठी गेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असतानाही संशोधनकार्यास उत्तेजन देण्यासाठी ते प्रयत्नरत राहिले, अनेक संशोधक विद्यार्थी त्यांनी घडवले.

डॉ. काचोळे यांची ही कळकळ आणि अभ्यास पाहूनच शरद जोशी यांनी त्यांच्या खांद्यावर ‘स्वतंत्र भारत पक्षा’च्या अध्यक्षपदाची धुरा दिली होती. डाव्या विचारांच्या मित्रवर्तुळात वावरत असतानाही उजवीकडे पाहणारे आणि शेतीप्रश्नी शेतकरी संघटनेची उजवी बाजू सांभाळताना तेथे प्रागतिक बाजू लावून धरणारे डॉ. मानवेंद्र काचोळे चर्चेत असत. शेतीप्रश्नी खुल्या बाजाराचे समर्थन करणाऱ्या काचोळे यांनी शेतकरी संघटनेला वैचारिक वळण देण्याचेही काम केले. डंकेल प्रस्तावाच्या समर्थनार्थ त्यांनी लिहिलेल्या सोप्या भाषेतील पुस्तिका शेतकरी संघटनेची भूमिका जनमानसात पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरल्या होत्या. शरद जोशी यांच्या आणि त्यांना भेटायला येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील महानुभावांच्या संपर्कातून मानवेंद्र काचोळे यांच्याभोवती निर्माण झालेले वलय अभ्यासूपणे प्रकटण्याचे होते. केवळ वैचारिक पातळीवरच नव्हे, तर साहित्य, नाटक या क्षेत्रांतही त्यांना रस होता. त्यांच्या निधनाने मराठवाडय़ातील कर्तबगार अस्वस्थ पिढीचा प्रतिनिधी हरपला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 12:01 am

Web Title: dr manvendra kachole profile abn 97
Next Stories
1 इलाही जमादार
2 शंकर सारडा
3 अँड्रय़ू ब्रूक्स
Just Now!
X