वैद्यक विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी अजूनही फार थोडय़ा रोगांवर आपल्याला औषधे सापडलेली आहेत. अनेक रोग असे आहेत जे विशिष्ट प्रदेशात दिसून येतात. त्यापैकी एक म्हणजे कालाआजार. भारतीय उपखंडात या आजाराचे किमान ४० हजार रुग्ण दरवर्षी आढळून येतात. हा आजार ‘लेशमानिया डोनोव्हानी’ या परोपजीवी जंतूमुळे होणाऱ्या या आजारावर मिल्टेफोसाइन नावाचे औषध दिले जाते पण त्याला हा जंतू दाद देतोच असे नाही. या जटिल आजारावर कोलकात्याच्या मिताली चॅटर्जी यांनी मोलाचे संशोधन केले आहे. त्यांना सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा ‘जानकी अमल जैववैज्ञानिक पुरस्कार’ (वरिष्ठ विभाग) जाहीर झाला आहे.

मिताली या एमबीबीएस आहेत व फार्माकॉलॉजीच्या प्राध्यापकही. इन्स्टिटय़ूट ऑफ पोस्टग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रीसर्च या कोलकात्याच्या संस्थेत त्या शिकवतात. फार्माकॉलॉजी म्हणजे एखादे औषध शरीरात गेल्यानंतर ते कसे काम करते हे सांगणारे शास्त्र. मिताली यांनी कोलकाता वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली, तर  कोलकात्याच्या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातून त्यांनी फार्माकॉलॉजीत एमडी पदवी घेतली.   न्यूकासल विद्यापीठातून त्या १९८९ मध्ये कर्करोगविज्ञानात एमएस्सी झाल्या. कोलकात्याच्या जादवपूर विद्यापीठाच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल बायॉलॉजी या संस्थेतून त्यांनी प्रतिकारशक्ती विषयात पीएच.डी. संशोधन केले. नंतरच्या काळात त्यांनी इम्युनोफार्माकॉलॉजी या विषयात संशोधन करताना लेशमॅनियासिसवरील (म्हणजे काला आजार) उपचारांच्या दिशेने लक्ष केंद्रित केले. निदान व उपचार या दोन्हीत त्यांनी काम केले आहे.  काला आजार हा उष्णकटिबंधात जाणवणारा आजार आहे. या आजारानंतर त्वचेवरही परिणाम होतो. त्याला डर्मल लेशमॅनियासिस म्हणतात. तो भारतीय उपखंडातच (बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश इ. राज्ये) आढळतो. हा आजार नेमका कशामुळे होतो व शरीरात कसा पसरत जातो हे सांगण्याची जबाबदारी मिताली यांनी पार पाडली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील चमूने डीएनएवर आधारित रोगनिदान पद्धती या आजारावर शोधून काढली. पश्चिम बंगालमध्ये त्यामुळेच सक्रिय पाहणीतून काला आजारावर नियंत्रण मिळवणे थोडय़ाफार प्रमाणात शक्य झाले आहे. या आजाराच्या संशोधनासाठी मिताली यांनी खास प्रयोगशाळाही स्थापन केली आहे. त्यांनी या रोगावर केमोथेरपीची वेगळी पद्धत शोधून काढली. २०१५ मध्ये त्यांना राष्ट्रीय विज्ञान अकादमीने गौरवले होते तर २०१७ मध्ये भारतीय विज्ञान अकादमीचे सदस्यत्व त्यांना मिळाले आहे.