17 November 2017

News Flash

डॉ. मुरली बनावत

सौर ऊर्जेचा पर्याय हा यात महत्त्वाचा ठरतो याचे कारण त्यात तुलनेने प्रदूषण कमी आहे.

लोकसत्ता टीम | Updated: July 15, 2017 2:38 AM

डॉ. मुरली बनावत

पारंपरिक ऊर्जास्रोतांना असलेल्या मर्यादा आतापर्यंत स्पष्ट झाल्या आहेत. एक तर हे ऊर्जास्रोत कधी तरी संपू शकतात. शिवाय त्यामुळे प्रदूषण जास्त प्रमाणात होऊन हवामान-बदलासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. जीवाश्म व हायड्रोकार्बनवर आधारित ऊर्जास्रोतांना पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता अणू ऊर्जेइतकाच सौर ऊर्जा हाही एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे. कुठल्या एका ऊर्जास्रोतावर अवलंबून राहण्यासारखी सध्याची परिस्थिती नाही. सौर ऊर्जेचा पर्याय हा यात महत्त्वाचा ठरतो याचे कारण त्यात तुलनेने प्रदूषण कमी आहे. पण सध्या तरी सौर ऊर्जेची साठवण, त्याला लागणारी जागा व सूर्यप्रकाशाची उपलब्धता, जास्त खर्च ही आव्हाने त्यात आहेत. त्यामुळे सौर ऊर्जेवर अजून बरेच संशोधन आवश्यक आहे. या पाश्र्वभूमीवर सौर ऊर्जेच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे तेलंगणचे वैज्ञानिक डॉ. मुरली बनावत यांना ब्रिक्स देशांनी जाहीर केलेला तरुण वैज्ञानिक पुरस्कार निश्चितच महत्त्वाचा आहे.

हैदराबाद विद्यापीठात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी सौर ऊर्जेवर संशोधन केले आहे. मूळचे तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्य़ातील असलेल्या बनावत यांनी फोटव्होल्टॅइक सोलर सेलवर संशोधन केले आहे. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून बीएस्सी तर हैदराबाद विद्यापीठातून एमएस्सी पदवी घेतली. नंतर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेतून फोटोव्होल्टॅइक सेल (प्रकाशीय सौर घटांवर) पीएच.डी. केली. त्यांचे शोधनिबंध नेचर, अ‍ॅडव्हान्सड् मटेरियल्स, जेएसीएस अशा अनेक नामांकित नियतकालिकांत प्रसिद्ध झाले असून फ्रंटियर्स इन ऑप्टिक्स अँड फोटॉनिक्स, फ्रंटिटर इन फिजिक्स या नियतकालिकांचे ते संपादकही आहेत. त्यांनी काही काळ सौदी अरेबियातील किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत संशोधन करताना सौर ऊर्जा साठवण्यासाठी नवीन रासायनिक घटकांचा शोध घेतला आहे.

फोटोव्होल्टॅइक सेल म्हणजे प्रकाशीय सौर विद्युतघटांसाठी सेंद्रिय व पेरोव्हस्काइट पदार्थ किफायतशीर ठरतात, ही गोष्ट त्यांनी प्रथम प्रयोगानिशी दाखवून दिली. सौर ऊर्जा हा प्रदूषणविरहित स्रोत असला, तरी त्याच्या साठवणुकीत असलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यासाठी पेरोव्हस्काइटचा वापर केलेले स्वस्त व वापरण्यास सोपे विद्युत घट त्यांनी तयार केले आहेत. त्यांच्या मते सौर ऊर्जा साठवणीसाठी नवीन रासायनिक पदार्थाचा शोध घेतला पाहिजे. विशेष म्हणजे असे रासायनिक पदार्थ विकसित करण्यात त्यांच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे. कमी तपमानाला धातूच्या ट्रायहलाइड व पेरोव्हस्काइटवर प्रक्रिया करता येते व सौर ऊर्जेसाठी वापरण्याच्या साधनात या पदार्थाचा वापर आगामी काळात महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे त्यांचे हे संशोधन आश्वासक आहे. पेरोव्हस्काइट स्फटिकांचा वापर करून सौर ऊर्जा किफायतशीर करणे, शिसेविरहित पेरोव्हस्काइटचे काही नॅनोमीटर ते काही मायक्रोमीटरचे संच तयार करणे, मोठे सौर पॅनेल कमी खर्चात तयार करणे या तीन उद्दिष्टांत त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले आहे. सौरघटाच्या निर्मितीत प्रकाशीय भौतिकशास्त्रातील सिद्धांत महत्त्वाचे असतात, त्यात डॉ. मुरली यांनी मोठे काम केले असून त्याचा फायदा केवळ भारतालाच नव्हे तर ब्रिक्स देशांनाही होणार आहे. त्यामुळेच अशा संशोधनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला गौरव उचितच आहे.

First Published on July 15, 2017 2:38 am

Web Title: dr murali banavoth selected as young scientist for brics