मूळचे अकोल्याचे व सध्या हैदराबाद विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. नियाज अहमद यांना जाहीर झालेला शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार हा निष्ठेने काम करीत राहणाऱ्या संशोधकाचा यथोचित सन्मान आहे. अहमद अकोल्याजवळील पारस या लहानशा खेडय़ात जन्मले. वडील कोरडवाहू शेतकरी. शेतीत पिकत नाही म्हणून वडिलांनी चरितार्थासाठी घरीच किराणा दुकान थाटलेले. ते सांभाळतच अहमद यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. अकोल्यातून बारावी झाल्यावर अहमदांना वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते, पण अवघ्या तीन गुणांनी प्रवेश हुकला व त्यांनी नागपूरच्या पशुवैद्यक महाविद्यालयाची वाट धरली. ‘आरंभापासून मूलभूत संशोधनाकडे कल असलेला हा विद्यार्थी क्रमिक पुस्तके वाचायचाच नाही. मानव व पशूंच्या शरीरातील विविध पेशींवर आधारित संशोधनपत्रिका (जर्नल्स) कायम त्याच्याजवळ असत’, अशी आठवण त्यांचे गुरू व सध्या याच महाविद्यालयातील औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. नारायण दक्षिणकर सांगतात.

पशुवैद्यकशास्त्रात पदवी मिळाल्यावर अहमद यांनी हरियाणातील कर्नालच्या राष्ट्रीय डेअरी संशोधन केंद्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९८ ला ते हैदराबादच्या डीएनए संस्थेत संशोधक म्हणून रुजू झाले. २००८ मध्ये विद्यापीठात दाखल झालेल्या अहमद यांनी गेल्या १५ वर्षांत संशोधन क्षेत्रात मोठी मजल गाठली आहे. जिवाणूंमुळे मानवाला होणारे आजार व त्याचे निदान, हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय आहे. पशू व मानवांना होणाऱ्या आजारातील साम्य, तसेच पशूंच्या आजारामुळे मानवावर होणारे दुष्परिणाम, हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिला आहे. सध्या त्यांनी ‘वन हेल्थ’ या उपक्रमांतर्गत जिवाणूंमुळे मानवाला कर्करोग होतो का? आणि होत असेल तर त्याचे निदान, यावर संशोधन सुरू केले आहे. हे करताना येणारी पैशाची अडचण, हीच या देशातील प्रमुख अडचण आहे. अनेक प्रकल्पांना सरकारकडून निधी मिळवताना येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाय योजले पाहिजे, असे ते बोलून दाखवतात.

जातिधर्माच्या कोंदणात न अडकता गुणवत्तेला कठोर परिश्रमाची जोड देत यश मिळवणारे डॉ. अहमद ‘या क्षेत्रातील माझे सर्व गुरू हिंदू होते, पण कुणीही मला भेदाचा लवलेशही जाणवू दिला नाही’, असे मत आवर्जून नोंदवतात. त्यांच्या संशोधनामुळे प्रभावित झालेले ‘नोबेल’विजेते ऑस्ट्रेलियातील संशोधक गॅरी मार्शल यांनी २०११ मध्येच अहमद यांना हा पुरस्कार देण्यात यावा, अशी शिफारस वैद्यकीय व औद्योगिक संशोधन परिषदेकडे केली होती. अतिशय गरीब कुटुंबातून आलेले अहमद केवळ स्वतच शिकले नाहीत, तर त्यांनी त्यांच्या तीनही भावांना शिकवले. आचार्य पदवी मिळवणारे हे तिघेही उच्चपदांवर आहेत. अहमद यांनी पशू व मानव यांच्यातील समान धागे शोधत संशोधन करून प्रथमच एका पशुवैद्यकाला शांतिस्वरूप भटनागर पुरस्काराचा मान मिळवून दिला आहे.