कंपन्यांची संचालक मंडळे कशा प्रकारे निर्णय घेतात, त्यांचे दूरगामी परिणाम काय होतात याची उकल करणारे अर्थशास्त्रज्ञ म्हणजे ऑलिव्हर विल्यमसन. कंपनी क्षेत्राचा सरधोपट अभ्यास न करता वेगळ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यातूनच ते २००९ मध्ये अर्थशास्त्राच्या नोबेलचे मानकरी ठरले होते. विल्यमसन यांचे नुकतेच निधन झाले. अर्थशास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी विविध व्यवसाय संस्था, कंपन्या, सरकारी संस्था, संयुक्त प्रकल्प यांचे अंतर्गत कामकाज कसे चालते याचा बारकाईने अभ्यास केला. २००८ मध्ये अमेरिकेतील आर्थिक पेचप्रसंगाचा झाकोळ असताना २००९ मध्ये त्यांना राज्यशास्त्रज्ञ श्रीमती एलिनोर ओस्ट्रोम यांच्यासमवेत अर्थशास्त्राचे नोबेल देण्यात आले होते. उद्योगांचे नियमन व आर्थिक घडामोडी या विषयांसाठी त्यांना हे नोबेल मिळाले होते.  कुठलीही आस्थापने मुळात अस्तित्वात का व कशी येतात, काही उद्योगच विशिष्ट क्षेत्रात मक्तेदारी का मिळवतात, छोटय़ा कंपन्या तसे का करू शकत नाहीत असे वेगळे प्रश्न त्यांनी सोडवण्याचे ठरवले. एखादे उत्पादन तयार करायचे की दुसरीकडून घ्यायचे म्हणजे आउटसोर्स करायचे यावर निर्णय घेतले जातात तेव्हा नेमकी काय प्रक्रिया घडते याबाबत त्यांनी नवीन प्रकाश टाकला. ते अर्थशास्त्रज्ञ असले तरी त्यांचा मूळ पिंड हा समाजशास्त्रज्ञाचा होता. वर्तनात्मक अर्थशास्त्र ही शाखा लोकप्रिय होण्याच्या आधीपासून त्यांनी कायदा, मानसशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र यांचे अर्थशास्त्राशी असलेले नाते शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच समकालीन अर्थशास्त्राचा पाया बळकट झाला.

विल्यमसन यांचे शिक्षण मॅसॅच्युसेटस् इन्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत झाले.  पुढे स्टॅनफर्डमध्ये शिकत असताना त्यांना अर्थशास्त्राची गोडी लागली. नोबेल विजेते केनीथ अ‍ॅरो यांनी त्यांना या क्षेत्रात आणले; तर जेम्स मार्च व हर्बर्ट सिमॉन यांनी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन दिला.विल्यमसन हे ऑली या लाडक्या नावाने ओळखले जात असत. जनरल इलेक्ट्रिक कंपनीत अभियंता म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. नंतर १९७० त्या दशकात ते अर्थशास्त्राकडे वळले आणि तीन दशके बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात अध्यापन केले. येल विद्यापीठ कार्नेगी तंत्रज्ञान संस्थेतही त्यांनी काम केले. सहकारी व विद्यार्थ्यांना घरी बोलावून ते चर्चा करीत. ‘अर्थशास्त्रज्ञ म्हणून नोबेल मिळाले असले तरी शिक्षकी पेशाने जास्त समाधान दिले,’ असे ते म्हणत असत.