मेंदूचे कार्य समजून घ्यायचे असेल तर आपल्या शरीरातील जैवरसायनांची काम करण्याची पद्धत जाणून घेणे आवश्यक असते. त्यातून मेंदूचे अनेक आजार नेमके कशामुळे होतात याचा पुरेसा उलगडा होतो. हे काम आतापर्यंत अनेक वैज्ञानिकांनी केले असले तरी अजून अनेक कोडी बाकी आहेत. असे असले तरी त्यांच्या संशोधनातून मेंदूच्या आजारांवर औषधे उपलब्ध झाली आहेत. मेंदूवर नेटाने संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे डॉ. पॉल ग्रीनगार्ड.

ते मेंदू जीवशास्त्रज्ञ होते. इ.स. २००० मध्ये त्यांना वैद्यक शाखेचे नोबेल कँडेल व कार्लसन यांच्यासमवेत मिळाले होते. मानवी मेंदूतील चेतातंतूंमध्ये संदेशांची होणारी देवाणघेवाण हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यातून अमली पदार्थाचे व्यसन, नैराश्य, स्किझोफ्रेनिया, कंपवात (पार्किन्सन) या रोगांची कारणमीमांसा करणे सोपे झाले. ग्रीनगार्ड यांची सगळी कारकीर्द रॉकफेलर विद्यापीठात घडली. सुरुवातीला त्यांचे काम दुर्लक्षित राहिले होते, पण नंतर उशिरा त्याची दखल घेतली गेली. मानवी मेंदूतील चेतातंतू हे विद्युत व रासायनिक संदेश एकमेकांच्या समन्वयाने काम करीत असतात, असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्यामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतले जाऊ लागले. कंपवात व स्मृतिभ्रंश हे रोग कसे होतात, मेंदूतील काही पेशींचा ऱ्हास होतो, पण काहींचा होत नाही असे का घडते यावर त्यांनी बरेच संशोधन केले; त्यासाठी ते मेंदूच्या पेशींचा सातत्याने अभ्यास करीत राहिले. स्मृतिभ्रंश म्हणजे अल्झायमर या रोगात मेंदूच्या भागात काही प्रथिनांची पुटे तयार होतात, त्याबाबतही त्यांनी अभ्यास केला होता. त्यांनी नोबेल पारितोषिकाच्या रकमेतून जैवरसायनशास्त्रात संशोधन करणाऱ्या महिलांसाठी वेगळे पारितोषिक सुरू केले.

ग्रीनगार्ड यांचा जन्म न्यू यॉर्कचा. भौतिकशास्त्र व गणित यांची आवड त्यांना होती. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी एमआयटी या नामांकित संस्थेत ते रडार विकसित करण्याच्या कामात सहभागी होते. १९४३ मध्ये ते नौदलात काम करीत होते. हॅमिल्टन कॉलेजमधून भौतिकशास्त्रात पदवी घेऊन त्यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्रात काम करण्याचे ठरवले होते. जैवभौतिकशास्त्रज्ञ डेटलेव ब्राँक यांच्या निमंत्रणावरून ते जॉन हॉपकिन्स विद्यापीठात आले. नंतर लंडन विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ येथे संशोधन केले. १९८३ मध्ये रॉकफेलर विद्यापीठात येऊन त्यांनी स्वत:ची प्रयोगशाळा सुरू केली. त्यांचा भौतिकशास्त्रातून जैवरसायनशास्त्राकडे झुकणारा प्रवास असा अनपेक्षित होता.

डॉ. पॉल ग्रीनगार्ड यांच्या निधनाने मेंदू संशोधनात अजोड कामगिरी करणारी व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली आहे.