X

डॉ. प्रीथिका कुमार

शिक्षण क्षेत्रात आता पूर्वीची गुरुकुल पद्धत तर राहिलेली नाही

शिक्षण क्षेत्रात आता पूर्वीची गुरुकुल पद्धत तर राहिलेली नाही, शिवाय एका वर्गात किमान ६० विद्यार्थी असल्याने त्यांच्याकडे व्यक्तिगत लक्ष पुरवणेही शक्य होत नाही. परदेशात मात्र विद्यार्थी संख्या कमी असल्याने हे शक्य असते. पूर्वीच्या काळी शिक्षक विद्यार्थ्यांला नावाने ओळखत असायचे व विद्यार्थ्यांला शिक्षकांचा आदर वाटत होता. आता यातले काहीही उरलेले नाही. या परिस्थितीत अमेरिकेतील कन्सास येथे विचिता स्टेट युनिव्हर्सिटीत काम करणाऱ्या सहायक प्राध्यापिका प्रीथिका कुमार यांना जाहीर झालेला सी होम्स मॅकडोनल्ड उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार इतरांचीही उमेद वाढवणारा आहे.

प्रीथिका कुमार या मूळच्या बंगळुरूच्या आहेत. बंगळुरू विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स व संगणक विषयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील विचिता स्टेट युनिव्हर्सिटी येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात एम.एस. व पीएच.डी. या पदव्या घेतल्या. प्रीथिका कुमार यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना हा पुरस्कार मिळावा यासाठी गळ घातली व सगळी प्रक्रियाही पूर्ण करून दिली. शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते केवळ वर्गातील चार भिंतींपुरते मर्यादित नसते तर तो विद्यार्थ्यांचा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक असतो हे निकष ज्यांना लागू आहेत त्यात प्रीथिका कुमार या एक नामवंत शिक्षिका आहेत. त्यांनी शिक्षकी पेशाला वाहून घेतले आहे व अध्यापनात वेगवेगळे प्रयोग करून सर्जनशीलता जोपासली आहे. प्रीथिका या विद्युत अभियांत्रिकी विभागात सहायक प्राध्यापिका आहेत. ‘आपले विद्यार्थ्यांशी नाते अधिक दृढ आहे, अध्यापन ही माझी आवड आहे. चांगला शिक्षक किंवा शिक्षिका बनण्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला पाहिजे, त्यांना विषय समजून देता आला पाहिजे, शिवाय विद्यार्थी व शिक्षक यांच्यात विश्वास, परस्पर आदर व मुलासारखी काळजी घेणाऱ्या पालकाचेही नाते असले पाहिजे’, असे प्रीथिका कुमार यांचे मत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आपण व्यक्तिगत लक्ष देतो त्यामुळे तेही आपला आदर ठेवतात, असा अनुभव त्या सांगतात. लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळू शकत असताना २००७ मध्ये त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्यानंतर भावी पिढीतील अनेक विद्युत अभियंते व सॉफ्टवेअर तज्ज्ञ त्यांच्या ज्ञानछत्राच्या मांडवातून गेले आहेत. शिक्षकी पेशा हा देश घडवण्यातला एक मोठा भाग कसा असतो, हे त्यांनी त्यांच्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.