भारतातील अग्रगण्य खगोलशास्त्रज्ञ प्रा. डॉ. आर. व्ही. भोसले यांची निधनवार्ता रविवारी, १५ जून रोजी आली. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे नाते खगोलशास्त्राशी जडले होते. देशातील पहिली ‘रेडिओ टेलिस्कोप’ दुर्बीण तयार करण्याचा मान त्यांचाच. विदेशात संशोधन करण्यात ते रमले होते; पण मातृभूमीत या कामाची मुळे अधिक विस्तारली पाहिजेत या भावनेने त्यांनी देशात येऊन या क्षेत्रात केलेले काम अजोड ठरले.

राजाराम विष्णू भोसले हे ‘डॉ. आर. व्ही. भोसले’ म्हणूनच परिचित होते. १२ नोव्हेंबर १९४८ रोजी त्यांचा जन्म झाला. कागल तालुक्यातील बस्तवडे हे त्यांचे मूळ गाव. भोसले-पाटील घराण्यात जन्मलेल्या या मुलाने कोल्हापुरात शिक्षण घेतल्यावर पुणे आणि मग उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गाठली. अहमदाबादला डॉक्टर विक्रम साराभाई यांनी ‘फिजिकल रीसर्च लॅबोरेटरी’ स्थापन केली होती. तेथे डॉ. प्रा. के. आर. रामनाथन, डॉ. सी. व्ही. रामन यांच्यासह भोसले यांनी योगदान दिले. भोसले यांनी बनवलेला रेडिओ टेलिस्कोप भारतातला पहिला ठरला. त्यायोगे आकाशगंगेतून रेडिओ लहरींचा अभ्यास करून प्रबंध जर्मनीला पाठवला आणि पीएच.डी. मिळवली. कॅनडात त्यांनी ‘सॅटेलाइट स्टडीज ऑफ द इयर’ आणि ‘गुरू ग्रहाचे ध्रुवीय अक्ष व किरणोत्सार’ या दोन विषयांवर संशोधन केले. या कामात ते तेथेच रमले होते, पण विक्रम साराभाई व प्रा. रामनाथन यांच्या आवाहनाला मान देऊन ते अहमदाबादला परत येऊन ३५ वर्षे निवृत्तीपर्यंत संशोधन कार्य करीत राहिले.

त्यानंतर ते कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये सुप्रतिष्ठ वैज्ञानिक (एमिरेटस सायंटिस्ट) म्हणून भौतिकशास्त्र विभागात सेवारत झाले. वीस वर्षे ते चिकाटीने शासनाच्या मागे लागून त्यांनी ग्रामीण भागातील संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन क्षेत्राबद्दल अभ्यास करता यावा यासाठी पन्हाळा येथे अवकाश संशोधन केंद्र सुरू केले. अमेरिकेतील मुरी ड्रायरसारखे शास्त्रज्ञ विद्यापीठामध्ये आले ते या केंद्रामुळे. डॉ. अब्दुल ए.पी.जे. अब्दुल कलाम किंवा अन्य मोठे शास्त्रज्ञ कोल्हापूरला आल्यावर आवर्जून भोसले यांची भेट घेत असत. डॉक्टर भटनागर यांच्या सहकार्याने त्यांनी उदयपूरला सौर वेधशाळा स्थापन केली होती. नासाच्या मंगळावरील संशोधन कार्यासाठी निवड झाली होती. महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव, पंचगंगा प्रदूषण, रंकाळा तलाव संवर्धन आदी समाजकार्यात तसेच विज्ञान प्रबोधिनी, निसर्गमित्र, मराठी विद्यान परिषद आदी संघटनांमध्ये ते कार्यरत होते. त्यांना कोल्हापूर भूषण पुरस्कार तसेच डी. वाय. पाटील विद्यापीठाची सन्माननीय डी.लिट्. उपाधी मिळाली होती.