अहमदनगर जिल्ह्य़ातील पुणतांबा येथील मराठी माध्यमाच्या, सरकारी शाळेत शिक्षण घेतलेले डॉ. राजेंद्र शिंदे हे फक्त मुंबईच नाही तर देशभर ख्याती असलेल्या प्रतिष्ठित सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे प्राचार्य झाले आहेत. काही प्रमाणात धार्मिक पगडा असलेल्या झेविअर्सच्या इतिहासात दीडशे वर्षांत पहिल्यांदाच बिगरख्रिस्ती प्राचार्याची नेमणूक झाली आहे. विद्यार्थिदशेपासून नाळ जुळलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य होण्याचे भाग्य मिळालेल्यांपैकी डॉ. शिंदे आहेत.

इंग्रज राजवटीत ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या सेंट झेविअर्स महाविद्यालयाची ओळखही आंग्ल भाषीच. मुंबईची भव्यता, त्यात इंग्रजी ओळख असलेले महाविद्यालय या कल्पनेचाही मराठी, मध्यमवर्गीय घरातील मुलाला बाऊ  वाटावा अशा काळात डॉ. शिंदे यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईची निवड केली. डॉ. शिंदे हे मूळचे वणीचे. वडील श्रीरामपूर येथे स्टेशन मास्तर म्हणून कार्यरत असल्यामुळे पुणतांबा येथील शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. झेविअर्सशी संलग्न असलेल्या वांद्रे येथील कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी अकरावीत प्रवेश घेतला. मुळातच निसर्गावर प्रेम करणाऱ्या शिंदे यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेऊन १९८० मध्ये झेविअर्समध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. वनस्पतींशी नाते जोडत, त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा प्रवास सुरू झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर महाविद्यालयातील वनस्पती संग्रहालयचे अभिरक्षक म्हणून त्यांनी काम सुरू केले. हे काम करीत असतानाच वनस्पतिशास्त्रात पीएच.डी.ही केली. आजपावेतो, जवळपास ३५ वर्षे विद्यार्थ्यांना घडवण्याचे व्रत त्यांनी घेतले आहे. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांनी निसर्गाची भाषा शिकावी यासाठी झटणारे, विद्यार्थ्यांमधील कुतूहलाला संशोधनाची वाट दाखवणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी त्यांची ख्याती आहे. टॅक्सनॉमी हा त्यांचा संशोधनाचा विषय आहे. औषधी वनस्पती, वनस्पतींची नावे यासाठी त्यांनी विशेष काम केले आहे. सामान्य माणसाला तुलनेने किचकट वाटणारा वनस्पतिशास्त्रासारखा विषय सोपा करून सांगण्यात त्यांची हातोटी आहे. अध्यापन, संशोधनाइतकीच त्यांची प्रशासकीय पकडही पक्की आहे. झेविअर्समध्ये परीक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समन्वय यांसह सात वर्षे उपप्राचार्यपदाची धुराही त्यांनी लीलया सांभाळली. महाविद्यालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षांत, विद्यापीठ म्हणून मान्यता मिळण्याकडे वाटचाल सुरू असलेल्या झेविअर्सला नवी ओळख मिळवून देण्यासाठी समर्थ नेतृत्व डॉ. शिंदे यांच्या रूपाने लाभले आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ
Love Jihad, pune, Pune University
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना