देशासाठी लाभदायी संशोधन करणारे डॉ. रजनीश कुमार यांची ओळख एक तरुण व उदयोन्मुख वैज्ञानिक अशीच आहे. मध्य प्रदेशातल्या सिंगरौली या छोटय़ा गावात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. नंतर पुढील शिक्षणासाठी ते रायपूरला (आता छत्तीसगडची राजधानी) आले. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत काम करतात. त्यांना नॅशनल  अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस (नासी) व स्कॉप्स यांचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनव संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांना हा पुरस्कार दिला जातो. विज्ञानातील संशोधनाचे काम हे चिकाटीचे असते हे तर खरेच पण त्यातही समाजोपयोगी संशोधन करणे महत्त्वाचे असते. डॉ. रजनीश कुमार यांनी ते केले आहे. पाणी व ऊर्जा क्षेत्रांत त्यांनी केलेले संशोधन या प्रकारचे आहे.

नॅचरल गॅस हायड्रेट्समध्ये अडकलेला मिथेन बाहेर काढण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याने त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. अनेक कंपन्यांशी संलग्न राहून डॉ. कुमार यांनी गॅस हायड्रेट्सचे रेणवीय पातळीवर संशोधन केले आहे. हायड्रेटची ऊर्जा क्षमता व मरिन गॅस हायड्रेट्सच्या साठय़ातून शाश्वत साधनांची निर्मिती करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांचे संशोधन नेहमीच्या चौकटीबाहेरचे आहे त्यात ऊर्जा व पाणी यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. हायड्रेट्समधून काढलेला मिथेन हा अपारंपरिक जीवाश्म इंधन मानला जातो, हायड्रेट्समधील मिथेनचे मोठे साठे भारतात आहेत. त्यामुळे पुढील शंभर वर्षांची ऊर्जा गरज भागू शकते असे त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. भारतात संशोधनासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. मायदेशात विज्ञान संशोधन करायचे असे ठरवूनच मी परदेशातून पुण्यात परतलो. तरुणांनी संशोधन क्षेत्राकडे वळायला हरकत नाही त्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण देशात आहे, असेही त्यांनी सांगितले. विज्ञानात संशोधनाची प्रेरणा त्यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या बंगळुरूच्या संस्थेत अभ्यास करीत असताना मिळाली, कारण तेथील शिक्षण दर्जेदार आहे. कार्बन डायॉक्साइड पकडणे व तो वेगळा काढणे, सागरी जलाचे निक्र्षांरीकरण व ऊर्जा संकलन या विषयात त्यांचे संशोधन आहे. पाण्याचा सॉल्व्हंट म्हणून वापर केला जातो ती क्लॅथरेट पद्धत त्यांनी वापरली.

कुमार यांनी २००३ मध्ये इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस या बंगळुरूच्या संस्थेतून स्नातकोत्तर पदवी घेतली, तर कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातून रसायन अभियांत्रिकीत पीएच.डी. केली. परदेशातील सारी प्रलोभने सोडून २०१० मध्ये ते पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत दाखल झाले. पीएनएएस, जेएसीएस, यांसारख्या अनेक नामवंत नियतकालिकांत त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील सर्वात जास्त अभ्यासल्या गेलेल्या तीन शोधनिबंधांसाठी त्यांना याआधी एक पुरस्कार मिळाला होता. कॅनडातील नॅशनल रीसर्च कौन्सिलचे ते फेलो आहेत.