ज्या मातीतून आपण सोन्यासारखे पीक घेतो त्या मातीचे आरोग्य कालांतराने बिघडत असते. त्या मातीच्या संवर्धनासाठी काम करणारे ‘मृदा वैज्ञानिक’ डॉ. रतन लाल यांना यंदाचे जागतिक अन्न पारितोषिक मिळाले आहे. अडीच लाख डॉलर्सचा हा पुरस्कार म्हणजे कृषी क्षेत्रातील नोबेलच. पहिला अन्न पुरस्कार भारताचेच डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना मिळाला होता. लाल हे आता पंचाहत्तरीत असूनही त्यांचे काम थांबलेले नाही. अन्नसुरक्षा क्षेत्रातील त्यांचे योगदान मृदा-आरोग्य आणि ‘मातीसुरक्षे’द्वारे मोठे आहे.  मातीचे आरोग्य सुधारून त्यांनी लहान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविले. चार खंडातील पाच दशकांच्या त्यांच्या कामात त्यांनी शेतकऱ्यांना मृदा संवर्धनाचे तंत्र आणि मंत्र शिकवले. त्यातून ५० कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला. अन्न व पोषण सुरक्षेतील त्यांच्या कार्यातून दोन अब्ज लोकांना सुरक्षित अन्न मिळाले. लाखो हेक्टर नैसर्गिक उष्णकटिबंधीय परिसंस्था त्यांनी वाचवल्या. त्यांनी पुरस्काराची सगळी रक्कम माती संशोधन व अन्न सुरेक्षला देण्याचे सूतोवाच केले आहे. मातीचे महत्त्व या पुरस्काराने अधोरेखित झाले अशी अतिशय समर्पक प्रतिक्रियाही त्यांनी दिली. मातीत वरच्या भागात दोन ते तीन टक्के इतके कार्बनचे प्रमाण असते पण पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, मध्य भारत व दक्षिणेकडील काही भागांत ते ०.२ ते ०.५ टक्के इतके खाली आले आहे. त्यामागे पिकांचे अवशेष जाळणे हेच कारण आहे. त्यातून पीक उत्पादनही कमी होते असे मत मांडताना लाल सूत्रच सांगतात- ‘मातीचे आरोग्य बिघडले की माणसांचे आरोग्य बिघडले म्हणून समजा’. भारतातील पीक उत्पादन चीनच्या निम्मे तर अमेरिकेपेक्षा बरेच कमी आहे, याला कारण मातीचे बिघडलेले आरोग्य हेच आहे. जमिनीचा कमी वापर व जास्त अन्नधान्य उत्पादन करण्याचे त्यांचे प्रारूप आहे. त्यांच्या मते ३० टक्के कमी जमीन वापरून व खतांचा वापर ५० टक्के कमी करूनही मोठे उत्पादन घेता येईल. लाल हे सध्या ओहायो स्टेट विद्यापीठात प्राध्यापक असून त्यांचा जन्म पश्चिम पंजाबमधील ‘कार्याल’चा. फाळणीमुळे ते कुटुंबीयांसमवेत हरियाणात राजौंद येथे आले. त्यांच्या वडिलांची तेथे शेती होती. लाल यांचे शिक्षण पंजाब कृषी विद्यापीठातून झाले. नंतर दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन संस्थेतून त्यांनी एमएस्सी केले. नंतर १९६५ मध्ये ते ओहायोला गेले. तेथे पीएच.डी. करून ऑस्ट्रेलिया व नायजेरियात माती संवर्धनाचे काम केले. ‘मातीचे गायन’ करणाऱ्या या वैज्ञानिकाने जगातील कृषी क्षेत्रास नवी दिशा दिली आहे.