अलीकडच्या काळात हवामान बदल हे थोतांड असल्याचे सांगून हे बदल रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना पाठिंबा न देण्याचे विपरीत धोरण अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले व नंतर त्यावर काही अंशी माघारीचे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांच्या या धोरणाने या प्रश्नाचे गांभीर्य कमी होत नाही. हवामान बदलात टोकाची हवामान स्थिती निर्माण होऊन कुठे पूर तर कुठे दुष्काळ, रोगराई अशा समस्या येतात हा आजवरचा अनुभव आहे. त्यासाठी हवामानविषयक माहितीचा प्रसार महत्त्वाचा ठरतो. अमेरिकन जिओफिजिकल युनियनचा हवामान संज्ञापन पुरस्कार डॉ. रिचर्ड बी. अ‍ॅले यांना जाहीर झाला आहे, त्याचे महत्त्व त्यामुळे वेगळेच आहे.

अ‍ॅले हे पेशाने भूगर्भवैज्ञानिक असून त्यांचे शिक्षण ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी व युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन येथे झाले. ग्लॅशियाऑलॉजी, आइसशीट्स, अ‍ॅब्रप्ट क्लायमेट चेंज हे त्यांचे संशोधनाचे खास विषय आहेत. ‘नेचर्स ओन’ या संस्थेच्या वतीने या पुरस्काराची रक्कम दिली जाते. ही संस्था, जीवाश्म, खनिजे व हवामानविषयक इतर क्षेत्रांत काम करते. संस्थेच्या सदस्य वैज्ञानिकांनाच हा पुरस्कार दिला जातो. वैज्ञानिक माहितीबाबत साक्षरता, स्पष्ट संदेश व विज्ञानमूल्यांचे आकलन या दृष्टिकोनातून हवामान बदलावर जे वैज्ञानिक काम करीत आले आहेत त्यात अ‍ॅले यांचा मोठा वाटा आहे. रिचर्ड अ‍ॅले हे पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीत प्रोफेसर आहेत. त्यांनी विज्ञान संज्ञापनात मोठे काम केले आहे. इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज कार्यकारी गटाचा पहिला अहवाल ‘दी फिजिकल सायन्स बेसिस’ नावाने प्रसिद्ध झाला होता, त्यात ते प्रमुख लेखक होते. टू माइल, टाइम मशीन आइस कोअर्स, अ‍ॅब्रप्ट क्लायमेट चेंज अँड अवर फ्यूचर, अर्थ ऑपरेटर्स मॅन्युअल ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. पब्लिशर्स वीकलीने त्यांच्या ‘टाइम मशीन’ या पुस्तकाचे विशेष कौतुक केले आहे. नेचर, सायंटिफिक अमेरिकन सायन्स, प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस या नियतकालिकांत त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी एकूण ८०० सादरीकरणे केली असून पारंपरिक माध्यमांनी वेळोवेळी केलेल्या ४ हजार प्रश्नांवर उत्तरादाखल माहिती दिली आहे. या माध्यमांना अधिकृत व अचूक माहिती देण्याचे काम त्यांनी केले आहे. जागतिक हवामान बदल या विषयावर त्यांनी जागतिक ऑनलाइन अभ्यासक्रमही राबवला आहे. अमेरिकी अध्यक्ष कार्यालय, उपाध्यक्ष कार्यालय, सिनेट यांनाही वेळोवेळी त्यांनी सल्ला दिला आहे. नासाचे टॉम वँगनर यांनी अ‍ॅले यांचा उल्लेख उत्तम संशोधक व संज्ञापक म्हणून केला आहे. यू टय़ूबवर रिचर्ड अ‍ॅले सायंटिस्ट या नावाने शोध केला तर तुम्हाला त्यांच्या अनेक माहितीपर व्हिडीओ बघायला मिळतात. हाऊ टू टॉक टू अ‍ॅन ऑस्ट्रिच – इट्स अस या व्हिडीओत त्यांनी कार्बन समतोल व समस्थानिके यांची रंजक माहिती दिली आहे.

अतिशय सोप्या भाषेत त्यांनी विज्ञान व मानवतेपुढील आव्हाने जनतेसमोर ठेवली आहेत. त्यातून जनजागृती मोठय़ा प्रमाणावर झाली आहे, अतिशय प्रभावी संवादकौशल्य त्यांना अवगत आहे. हवामान व ऊर्जाविषयक माहितीचा जर योग्य वापर केला तर अनेक आव्हानांचा सामना करणे सोपे होणार आहे. त्यामुळे त्यांचा हवामान बदलविषयक संवाद महत्त्वाचा ठरतो, कारण त्यामुळे पर्यावरण आणि अर्थशास्त्र एकमेकांना पूरक पद्धतीने काम करू शकतात. अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स अ‍ॅण्ड आर्ट्सचे सदस्य आहेत. त्यांना हेन्झ पुरस्कार, बीबीव्हीएल फाऊंडेशन फ्रंटियर नॉलेज अ‍ॅवॉर्ड, सेलगमन क्रिस्टल पुरस्कार मिळाले आहेत.