आपण सध्या जे चुंबकीय सस्पंदन प्रतिमांकनासाठीचे भले मोठे एमआरआय (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग) यंत्र पाहतो त्याच्या मदतीने सहजपणे प्रतिमा काढून त्या आधारे रोगनिदान करवून घेतो, पण ही पद्धत शोधण्यामागे ज्या काही जणांचे संशोधन होते त्यात एक होते रिचर्ड अर्न्‍स्ट. त्यांना या संशोधनासाठी नोबेलही मिळाले. त्यांच्या निधनाने एक साधा रसायनशास्त्रज्ञ ते मोठा संशोधक असा प्रवास करणारा फिरस्ता अनंताच्या प्रवासाला गेला आहे. अणूंच्या रासायनिक गुणधर्माचा वापर करून त्यांनी चुंबकीय सस्पंदन तंत्रज्ञान म्हणजे एमआरआयचा शोध लावला होता. या तंत्रज्ञानाचे नंतर केवळ वैद्यकशास्त्रच नव्हे, तर विज्ञानाच्या अनेक शाखेत उपयोग झाले. ईटीएच झुरिच येथे ते प्राध्यापक होते. त्यांच्या आधी ‘एनएमआर’ हे तंत्रज्ञान १९४० च्या सुमारास स्वित्र्झलडमध्ये जन्मलेले फेलिक्स ब्लॉख (स्टॅनफर्ड) व अमेरिकन शास्त्रज्ञ एडवर्ड मिल्स परसेल (हार्वर्ड) यांनी  विकसित केले होते. रेडिओ लहरी चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात व अणूच्या केंद्रकावरही त्याचा परिणाम होतो. रेडिओ लहरी बंद केल्या, की अणुकेंद्रक त्याच्या मूळ जागी जाते. त्यातूनच विद्युत चुंबकीय संदेश मोजता येतात हे स्पष्ट झाले.  या संशोधनासाठी  ब्लॉख व परसेल  यांना १९५२ मध्ये नोबेल मिळाले. अर्न्‍स्ट यांनी १९६२ मध्ये या एनएमआर तंत्राचे उपयोग किती वेगळे आहेत ते स्पष्ट केले. कालांतराने कॅलिफच्या पावलो अल्टो कंपनीत काम करताना अर्न्‍स्ट यांनी वेस्टन अँडरसन यांना काही कल्पना सुचवल्या. डॉ. अर्न्‍स्ट यांनी चुंबकीय सस्पंदन वर्णपंक्तीशास्त्र जास्त अचूक  करण्याचा प्रयत्न केला. अणूंवर वेगवान रेडिओ लहरींचा मारा करून कमी वेळात कुठलाही दोष शोधण्याचे प्रयत्न केले. अणूंचे गुणधर्म ओळखणे व वैद्यकशास्त्रात निदानासाठी त्यांचे तंत्र वापरले जाऊ लागले. पुढे त्यांनी या तंत्राचा द्विमिती आविष्कार केला. कालांतराने काही प्रथिनांच्या त्रिमिती प्रतिमा मिळवल्या. त्यातून एमआरआय म्हणजे चुंबकीय सस्पंदन तंत्राचा विकास झाला. त्याचा वापर रासायनिक संयुगांच्या रचना तपासण्यासाठी होऊ लागला. औषधांच्या जैविक क्रिया उलगडत गेल्या. अर्न्‍स्ट यांचा जन्म विंटरथरचा. तेथे त्यांचे पूर्वज पाचशे वर्षांपासून राहत होते. त्यांना आधी संगीतकार व्हावेसे वाटले होते पण एके दिवशी धातूशास्त्रज्ञ असलेल्या काकाची रसायनांची पेटी त्यांना दिसली तेव्हापासून ते रसायनशास्त्राकडे वळले. त्यांनी रसायनशास्त्राचे वाचन केले, घरातच प्रयोगही केले. त्यापायी इतर अभ्यास त्यांनी सोडूनच दिला. त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते; तरीही पुढे  शिकण्याची संधी मिळवून, रासायनिक अभिक्रियांची गूढे त्यांनी उकलली!