आपल्याकडे हवामान खात्याला नेहमी टीकेचे धनी व्हावे लागते, पण या वेळी सरकारी हवामान खात्याचा पावसाबाबतचा अंदाज खासगी संस्थेपेक्षा योग्य ठरला, त्याची नोंद फारशी कुणीही घेतली नाही. हवामान वैज्ञानिकांचे काम शाबासकीची थाप मिळणार नाही असे असते. ओडिशातील वादळातही आपल्याकडच्या वेधशाळांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले होते, पण त्याचीही फारशी दखल घेतली गेली नव्हती. शास्त्रातील प्रगतीने हवामान अंदाजातील त्रुटी कमी होतील, पण अचूक अंदाज कधीच शक्य नसतो, असे डॉ. रॉबर्ट व्हाईट त्यांनी म्हटले होते. परदेशात चोवीस तास हवामान अंदाज दिले जातात व तेही नेहमी अचूक असतात असे नाही, पण तेथे सरसकट टीका केली जात नाही. हे सांगण्याचे कारण म्हणजे ज्यांनी अमेरिकेच्या हवामान यंत्रणेला आकार दिला त्या रॉबर्ट व्हाईट यांचे नुकतेच निधन झाले.

व्हाईट यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९२३ रोजी बोस्टन येथे झाला. रॉबर्ट व्हाईट हे हार्वर्ड विद्यापीठाचे भूगर्भविज्ञान शाखेचे पदवीधर होते. त्यांना धातुशास्त्रात रस होता, पण त्यांना उन्हाळ्यात शिक्षकांनी शिकाऊ म्हणून हवामान खात्यात नोकरी मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून हवामानशास्त्रात विद्यावाचस्पती पदवी घेतली. आता ज्या हवामान बदलांचा आता गाजावाजा होत आहे त्याचा इशारा व्हाईट यांनी १९७९ मध्ये जीनिव्हातील पहिल्या हवामान परिषदेत दिला होता. १९६० पासून त्यांची कारकीर्द सुरू झाली ती पुढे अमेरिकेतील पाच अध्यक्षांच्या काळात सुरू होती. तेव्हाचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी त्यांना हवामान खात्यात आणले. विज्ञान, सरकार व जागतिक राजकारण यांचा एक समन्वय असतो तो डॉ. व्हाईट यांनी चांगला साधला होता. सुरुवातीला ते ट्रॅव्हेलर्स रीसर्च सेंटर या हार्टफोर्डच्या केंद्रात काम करीत होते. नंतर केनेडींनी त्यांना १९६३ मध्ये हवामान विभागाचे संचालक नेमले. दोन वर्षांनी तेव्हाचे अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी त्यांना पर्यावरण विज्ञान सेवा प्रशासनाचे प्रमुख नेमले. नॅशनल ओशनिक अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एनओएए) या संस्थेतही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्याच काळात अमेरिकेचा पहिला हवामान उपग्रह सोडला गेला. अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध असताना व्हाईट यांच्यामुळे दोन्ही देशांत हवामान माहितीची देवाणघेवाण सुरूच होती. देशातील शत्रुत्व सोडून वसुंधरेच्या कल्याणासाठी काम करणारा सच्चा वैज्ञानिक आपण गमावला आहे.