हेपॅटायटिस विषाणूच्या संसर्गावर महत्त्वाचे संशोधन करणारे रामचंद्र विद्यापीठाचे अधिष्ठाता व विशेष प्राध्यापक असलेल्या डॉ. एस. पी. त्यागराजन यांना अलीकडेच तामिळनाडू सरकारचा ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पाच लाख रुपये रोख व सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेली तीस ते चाळीस वर्षे अध्यापनाबरोबरच त्यांनी संशोधनात खर्ची घातली आहेत. केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित असे त्यांचे संशोधन नाही तर प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडेल अशा संशोधनात त्यांचा सहभाग आहे. कलाम निवर्तले त्याच वर्षीपासून मुख्यमंत्री जयललिता यांनी हा पुरस्कार सुरू केला होता. त्याचे वैशिष्टय़ म्हणजे तो स्वातंत्र्यदिनी दिला जातो. त्यागराजन यांना मिळालेल्या पुरस्काराने तरुण प्राध्यापक व शिक्षकांना प्रेरणा मिळणार आहे. आधी चांगले काम करा मग फळाची अपेक्षा जरूर धरा, असे त्यांचे सांगणे आहे.

डॉ. त्यागराजन यांनी केलेल्या संशोधनाविषयी सांगायचे तर त्यांनी हेपॅटायटिस बीवर व्हायरोहेप हे वनौषधींवर आधारित असलेले औषध तयार केले आहे व त्याचे पेटंट मद्रास विद्यापीठांतर्गत घेण्यात आले आहे. कावीळ व यकृताच्या रोगावर ८७ वनस्पतींपासून तयार केलेली किमान ३०० औषधे तरी आहेत; पण त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता नाही. त्यागराजन यांनी जे औषध तयार केले त्याचे प्रमाणीकरण करून पेटंटही मिळवले आहे ही त्यांची वेगळी कामगिरी. तामिळनाडूत विद्यापीठ-उद्योग यांचे संबंध जोडणारी शिक्षणपद्धती अवलंबण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

जर विद्यापीठातील संशोधन लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर विद्यापीठ व उद्योग यांच्यात संपर्क असणे आवश्यक आहे किंबहुना दोघांनी साहचर्याने काम केले पाहिजे असे त्यांचे आधीपासूनचे मत आहे, मी जेव्हा व्हायरोहेप या औषधाचे संशोधन केले त्या वेळी पहिल्यांदा मद्रास विद्यापीठाचा संबंध प्रत्यक्ष कंपन्यांशी जोडण्याची कल्पना पुढे आली, असे ते सांगतात. आज नवोद्योगांची संकल्पना पुढे आली असताना ‘इनक्युबेशन सेंटर्स’ असावी असे सांगितले जात आहे. अशी केंद्रे सुरू करण्यास प्रोत्साहन मिळण्याची गरज ते प्रतिपादन करतात. त्यांचे एकूण ३४५ शोधनिबंध व २० पुस्तके प्रसिद्ध असून आठ पेटंट त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी हेपॅटायटिस संसर्गावर कीझानेली म्हणजे फायलन्थस अमारस या वनस्पतीपासून औषध तयार केले. या वनस्पतीत हेपॅटायटिस बी व सी विषाणू मारण्याची क्षमता असते. या संशोधनासाठी त्यांना इटालियन सरकारचा शेवलियर पुरस्कारही यापूर्वी मिळाला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पातळीवर त्यांनी उच्च शिक्षणाची धोरणे ठरवण्यात मोठी भूमिका पार पाडली. भारतीय विद्यापीठांमध्ये मूलभूत विज्ञान संशोधनावर भर दिला जावा यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत. १९६९ पासून अध्यापन क्षेत्रात असलेल्या त्यागराजन यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक म्हणून त्यांच्या कामाचा गौरव एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाने जीवनगौरव पुरस्कार देऊन केला होता. औषधनिर्मिती, वैधता, पारंपरिक उपचार पद्धतींचे प्रमाणीकरण यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली असून हेपॅटायटिस बी, सी, संसर्गावर त्यांचे संशोधन महत्त्वाचे आहे. भारतातील हेपॅटायटिस बी लसीकरण कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यातही त्यांचा सहभाग आहे. एचआयव्ही विषाणूची लागण झाल्याने अनेक लोक मरतात ते केवळ या एका विषाणूने मरत नाहीत तर त्यात हेपॅटायटिससारख्या इतर काही विषाणूंची भर पडत असते. त्यामुळे एड्सवर उपचार करताना या विषाणूंचाही विचार करून सर्वसमावेशक उपचारपद्धती वापरली तर मृत्यूचे प्रमाण कमी होईल असा नवा दृष्टिकोन त्यांनी मांडला आहे.