पारंपरिक शेती करून भारतातील शेतक ऱ्यांचे उत्पादन दुप्पट होणे शक्य नाही, त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर डोळसपणे करण्याची गरज आहे. देशातील अनेक वैज्ञानिक त्यासाठी काम करीत आहेत. वाढत्या लोकसंख्येला अनेक देशांत तांदळाने मोठा हात दिला आहे. त्यामुळे जगभरात तांदूळ उत्पादन व त्याचे पौष्टिक घटक वाढवण्यासाठी ‘गोल्डन राइस’सारख्या प्रकल्पात संशोधन सुरू आहे. याच भात संशोधनाच्या क्षेत्रात विविधांगी काम करणारे हैदराबाद येथील भारतीय भात संशोधन संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. शैक एन मीरा यांची नियुक्ती संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीच्या सल्लागारपदी केली आहे. त्यांच्या नियुक्तीने भारतातील ज्ञानाचा लाभ जगाच्या विकासासाठी होणार आहे, ही अभिमानाची बाब.

मीरा हे डिजिटल शेतीमधील तज्ज्ञ मानले जातात व शाश्वत शेतीच्या क्षेत्रात त्यांचे काम महत्त्वाचे आहे. शेतीच्या डिजिटल विस्तारासाठी त्यांच्या कौशल्याचा वापर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार आहे. अलीकडच्या काळात पिकांच्या लागवडीपासून देखभालीपर्यंत अनेक कामे ड्रोनच्या माध्यमातून केली जातात, त्यात माहितीच्या आधारे शेतीमालाच्या भाकितापासून अनेक गोष्टी नव्या डिजिटल तंत्रज्ञानात केल्या जातात, त्याचा फायदा लहान शेतकऱ्यांना होऊ शकतो. इजिप्तमधील भातशेतीच्या धोरणांसाठी डॉ. मीरा हे मार्गदर्शन करणार आहेत. शेतीमधील डिजिटल धोरण निश्चितीचा १६ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, त्यातून ते इजिप्तमधील कृषी संस्थांची घडी व्यवस्थित बसवून देणार आहेत. डिजिटल क्रांतीची फळे शेतकऱ्यांच्या पदरात पडावीत यासाठी त्यांनी आतापर्यंत किमान ३५०० कृषी प्रकल्पांचे मूल्यमापन केले आहे, त्यातील अनेक प्रकल्प भारतातील आहेत. २०१२-१३ मध्ये त्यांनी फिलिपिन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेला ‘राइस डॉक्टर’ व ‘राइस नॉलेज बँक’ अशी दोन डिजिटल उपयोजने (अ‍ॅप) उपलब्ध करून दिली. त्या संस्थेत ते अभ्यागत संशोधक म्हणून काम करीत होते.

त्यांच्या संशोधनातून लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. आयोवा विद्यापीठात काम करताना त्यांनी डिजिटल तंत्रज्ञान व बाजारपेठा यांचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले होते. भारतीय कृषी क्षेत्रातील कामगिरीसाठी त्यांना आयसीएआरचा लालबहादूर शास्त्री पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण बारा पुरस्कार त्यांना मिळाले असून त्यात दोन सुवर्णपदकांचा समावेश आहे. आताच्या नियुक्तीने पुन्हा एकदा त्यांच्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली आहे.