News Flash

डॉ. शकुंतला हरकसिंग थिलस्टेड

२०२१ या जागतिक पोषण वर्षांच्या निमित्ताने त्यांच्या या पुरस्काराचे महत्त्व आणखी वाढणारे आहे

करोनाच्या विषाणूपुढे मानवी प्रतिकारशक्ती कशी कोसळली हे आपण पाहात आहोत, पण अन्य दुर्धर आजारही अयोग्य आहारपद्धतीमुळे होत असतात. आहारात मांसाहारापेक्षाही मत्स्याहार महत्त्वाचा आहे. त्यासाठी मत्स्यशेती हा एक पूरक व्यवसाय होऊ शकतो. या दिशेने विचार डॉ. शकुंतला हरकसिंग थिलस्टेड यांनी तो केला. त्यांची ओळख ‘जागतिक मत्स्यवैज्ञानिक’ अशी आहे. त्यांनी स्वीकारलेल्या पोषणाच्या या वेगळ्या मार्गाचा गौरव म्हणून, त्यांना २०२१ चा ‘जागतिक अन्न  पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला.  मत्स्यशेती, जमीन व पाण्यातील अन्न उत्पादनांची सांगड हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. हा पुरस्कार मिळालेल्या त्या आशियाई वंशाच्या पहिल्या महिला वैज्ञानिक. थिलस्टेड यांनी बांगलादेश व कंबोडियात सापडणाऱ्या माशांतील  अनेक सूक्ष्म पोषके व मेदाम्ले ओळखली. यातून आहाराची दिशाच बदलण्याचा त्यांचा प्रयत्न असून लहान मुलांना त्यांच्या वयाच्या पहिल्या हजार दिवसात ही सूक्ष्मपोषके मिळणे गरजेचे असते. जमीन व पाण्यातून उपलब्ध होणाऱ्या अन्नाचा एकात्मिक वापर त्यांनी सुरू केला. त्यातून जगभरच्या लाखो महिला, मुलांचे पोषण सुधारणार आहे. छोटय़ा माशांपासून आपण अनमोल अशी पोषके  मिळवू शकतो, हे संशोधन वेगळेच ठरले. भारत, नेपाळ, बर्मा, झांबिया, मलावी यांसारख्या देशांत स्थानिक मासे वाळवून वा ताजे दोन्ही प्रकारे देता येऊ शकतात; चटणीपासून लापशीपर्यंत कशातही त्याचा वापर करता येतो.  याविषयीच्या त्यांच्या संशोधनातून मासे व इतर अन्नपदार्थाचा समावेश असलेली नवी आहारपद्धती विकसित होऊ शकली. कमी किमतीत हे मासे उपलब्ध व्हावे यासाठी बांगलादेशात त्यांनी  मत्स्यतळी ही कल्पना  पुढे आणली.  माशांची चटणी वा पावडर यांतून ताज्या माशांपेक्षा चौपट अधिक पोषके मिळतात. मत्स्यशेतीच्या व्यवसायातून अनेकांना रोजगारही मिळाले आहेत. त्यांनी माशांपासून पूरक अन्न तयार करण्याचे प्रशिक्षण स्थानिक महिलांना दिले.  विद्यार्थी, संशोधक,  कार्यकर्ते, धोरणकर्ते यांच्याशी चर्चा करून त्यांनी पोषक माशांच्या जातींची पैदास करण्यास शिकवले.  ‘वर्ल्डफिश’ या संस्थेत पोषण व सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या त्या प्रमुख आहेत. त्यांचा जन्म त्रिनिदादचा. टोबोगो येथे त्यांनी मत्स्य मंत्रालयात पहिल्या महिला अधिकारी म्हणून काम केले. २०२१ या जागतिक पोषण वर्षांच्या निमित्ताने त्यांच्या या पुरस्काराचे महत्त्व आणखी वाढणारे आहे. भाताबरोबर मासे कशाला याचे संशोधन त्यांनी डेन्मार्कमध्ये कोपनहेगन विद्यापीठात केले, तेव्हापासून माशांमधील पोषक मूल्यांची महती त्या जगाला पटवून देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:41 am

Web Title: dr shakuntala haraksingh thilsted of indian descent wins world food prize 2021 zws 70
Next Stories
1 राजीव सातव
2 व्ही. चंद्रशेखर
3 प्रेरणा राणे
Just Now!
X