जगभरच्या अनेक देशांत बीफ, पोर्क, चिकन यांचे मोठय़ा प्रमाणात सेवन केले जाते. काही वर्षांनी आपण अन्नधान्याप्रमाणेच फार मोठय़ा लोकसंख्येला मांस पुरवू शकणार नाही. यावर उपाय म्हणून मूळचे आंध्र प्रदेशचे असलेल्या डॉ. उमा व्हॅलेटी यांनी अमेरिकेतील प्रयोगशाळेत प्राण्यांच्या पेशींपासून मांसाची निर्मिती केली. प्राण्यांची कत्तलही होणार नाही, कुणाच्या धार्मिक भावनाही दुखावणार नाहीत असा उपाय म्हणून प्रयोगशाळेत मांस तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. असे मांस तयार करण्याचा त्यांचा हा प्रकल्प नवोद्योगातच मोडणारा आहे.
डॉ. व्हॅलेटी हे सध्या मिनसोटातील मिनायपोलिस येथे हृदयविकारतज्ज्ञ. पुडुचेरी येथील जवाहरलाल इन्स्टिटय़ूट ऑफ वैद्यकीय शिक्षण-संशोधन संस्थेतून त्यांनी वैद्यकाची पदवी घेतली. त्यानंतर मेयो स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस या संस्थेची हृदयविकारशास्त्रातील पदवी मिळवून ते अमेरिकेत गेले, तेथे बफेलो येथील द स्टेट युनिव्हर्सटिी ऑफ न्यूयॉर्कमध्ये त्यांनी वैद्यकशास्त्राची आणखी एक पदवी घेतली. गेली वीस वष्रे ते अमेरिकेत एक निष्णात हृदयरोगतज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत. काही नवीन वैद्यक उपकरणांचा शोध लावला आहे. उद्यमशीलता हा गुणही त्यांच्यात असल्याने त्यांनी संशोधनाला त्याची जोड दिली. त्यासाठी मेम्फिस मीटस् ही कंपनी स्थापन केली, त्यात दोन परदेशी भागीदारही आहेत. या कंपनीने अलीकडेच प्राण्यांच्या पेशी पेट्रीडिशमध्ये वाढवून मांसाचा गोळा तयार केला, त्यासाठी ९ ते ४१ दिवसांचा कालावधी लागला. हा एक गोळा तयार करण्यास एक हजार डॉलर खर्च आला. त्या हिशेबाने एक पौंड मांसासाठी १८ हजार डॉलर्स इतका खर्च अपेक्षित आहे, पण या तंत्रज्ञानात आणखी प्रगती झाली तर येत्या पाच वर्षांत अशा प्रकारे मोठय़ा प्रमाणावर मांस तयार करून ते विक्रीसाठी ठेवणे कठीण नाही.
यापूर्वी २०१२ मध्ये नेदरलँडसचे वैज्ञानिक मार्क पोस्ट यांनी प्रयोगशाळेत हॅम्बर्गर तयार केला होता, त्याची किंमत ३ लाख ३० हजार डॉलर्स होती, पण ती ११ डॉलपर्यंत खाली आणता येईल असे त्यांचे म्हणणे आहे. चीननेही तियानजीन येथे क्लोिनग करून अ‍ॅनिमल फार्म तयार करण्याचे ठरवले आहे. तेथे घोडे, कुत्रे, बकरे, गाय, बल यांचे क्लोिनग करून नंतर त्यांची कत्तल होईल. पण डॉ. व्हॅलेटी यांच्या तंत्रज्ञानात प्राण्यांविना, केवळ त्यांच्या पेशींपासून मांस तयार होईल. त्यांनी याचे प्रात्यक्षिक सॅनफ्रान्सिस्को येथे दाखवले. त्याचे प्रत्यक्ष सेवनही करण्यात आले व अनेकांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. गाई-म्हशींच्या शेणातून मोठय़ा प्रमाणावर हरितगृह वायू बाहेर पडत असतात, ते प्रमाण या मांसनिर्मिती प्रक्रियेत ९० टक्के कमी होणार आहे. शिवाय, प्राण्यांच्या मांसात कीटकनाशके, प्रतिजैविके यांचे अंश असतात तेही असणार नाहीत, त्यामुळे आरोग्यावरचा आपला खर्च कमी होणार आहे.