23 May 2018

News Flash

डॉ. उषा जोशी

कार्यात सुरुवातीपासूनच उषाताईंचे सक्रिय योगदान दिले.

डॉ. उषा जोशी

 

आधीचे हैदराबाद संस्थान, नंतर हैदराबाद प्रांत आणि पुढे आंध्र प्रदेश राज्य (आता तेलंगणही) या प्रवासात हैदराबादेत मराठी भाषा आणि संस्कृतीचा अवकाश समृद्ध करण्याचा प्रयत्न निष्ठापूर्वक काही मंडळींनी केला. आरंभीच्या काळात डॉ. ना. गो. नांदापूरकर, भालचंद्र महाराज कहाळेकर, डॉ. श्रीधर कुलकर्णी यांसारख्या आधीच्या पिढीतील विद्वान प्राध्यापकांनी तिथल्या मराठी वाङ्मयीन चळवळीचे नेतृत्व केले. पुढील काळात या विद्वत्गणांचे कार्य तितक्याच निष्ठेने आणि क्षमतेने पुढे नेले ते द. पं. जोशी आणि त्यांच्या सहचारिणी डॉ. उषा जोशी यांनी. सहा वर्षांपूर्वी दपं यांच्या आणि आता उषाताईंच्या निधनाने हैदराबादेतील मधल्या पिढीच्या कृतिशील मराठीनिष्ठांना मराठी समाज मुकला आहे.

भाषावार प्रांतरचनेनंतरच्या काळात हैदराबादमध्येच जाणीवपूर्वक राहून दपं यांनी मराठी भाषा-साहित्याच्या क्षेत्रात लक्षणीय कार्य केले. त्यांच्या या कार्यात सुरुवातीपासूनच उषाताईंचे सक्रिय योगदान दिले. दपंसह उषाताईंनी अनेक साहित्यविषयक ग्रंथांचे संपादन केलेच, शिवाय हैदराबादेतील मराठी साहित्य परिषद या वाङ्मयीन संस्थेच्या जडणघडणीत दपंबरोबरच उषाताईंचाही मोलाचा वाटा आहे. आधीच्या पिढीतील महानुभावांच्या कार्याची आणि विद्वत्तेची जाण असलेल्या उषाताईंनी पुढे म. सा. परिषदेच्या अध्यक्षपदाची धुराही जबाबदारीने सांभाळली. तसेच परिषदेच्या ‘पंचधारा’ या मुखपत्राचे संपादनही उषाताईंनी साक्षेपाने केले. त्यांच्या संपादकीय कारकिर्दीतील ‘पंचधारा’च्या अंकांकडे पाहिल्यास हे ध्यानात येईल. दीर्घकाळ मराठीचे अध्यापन केलेल्या उषाताईंनी उस्मानिया विद्यापीठातील मराठी विभागप्रमुखपदही भूषविले. २०१० साली सेतुमाधवराव पगडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या समग्र साहित्याचे आठ खंड दपं आणि उषाताईंनी संपादित केले होते. या व्यतिरिक्त उषाताईंनी ‘मऱ्हाटी स्त्री-रचित रामकथा’ हा डॉ. नांदापूरकरांनी संग्रहित केलेल्या मराठवाडय़ातील रामकथेवरील ओवीगीतांचा ग्रंथ संपादित केला आहे. तब्बल सहा हजार ओव्यांचा संग्रह असलेला हा पाचशे पृष्ठांचा संपादित ग्रंथ उषाताईंच्या संपादनदृष्टीचा प्रत्यय देणारा आहे. याशिवाय ‘समर्थ साहित्यातील आकृतिबंध’ या स्वतंत्र समीक्षापर ग्रंथाचे लेखनही त्यांनी केले आहे. या ग्रंथात समर्थ रामदासांचे विभूतीमत्त्व आणि त्यांचे काव्य यांच्यात गल्लत न करता समर्थाच्या काव्याचा निखळ साहित्यरचनेच्या दृष्टीने उषाताईंनी घेतलेला परामर्श म्हणजे त्यांच्या अभ्यास आणि भाषाजाणिवेची खूणच आहे.

First Published on February 7, 2018 4:37 am

Web Title: dr usha joshi
  1. No Comments.