17 July 2019

News Flash

डॉ. वॉलेस ब्रोकेर

त्या काळात ज्या वैज्ञानिकाने प्रथम या संकल्पना मांडल्या ते वॉलेस ब्रोकेर!

अलीकडच्या काळात हवामान बदल व ग्लोबल वॉर्मिग (पृथ्वीची तापमानवाढ) या संकल्पना सर्वाच्याच परिचयाच्या असल्या तरी ज्या काळात पृथ्वीची अशी तापमानवाढ होऊ  शकते हे माहीत नव्हते, त्या काळात ज्या वैज्ञानिकाने प्रथम या संकल्पना मांडल्या ते वॉलेस ब्रोकेर! त्यांच्या निधनाने या क्षेत्रातील एक प्रज्ञावान वैज्ञानिक आपण गमावला आहे.

१९७० च्या सुमारास त्यांनी कार्बन डायऑक्साइडमुळे पृथ्वी तापते आहे हे पहिल्यांदा सांगितले तेव्हा अनेकांना त्याचा अर्थबोध झाला नव्हता, पण हवामान बदलांचा सागरी प्रवाहांशी असलेला संबंधही त्यांनी उलगडून दाखवला होता. न्यू यॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी जवळपास ६७ वर्षे संशोधन केले. १९७५ मध्ये त्यांचा एक शोधनिबंध सायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता त्याचे नाव होते ‘क्लायमेटिक चेंज- आर वुई ऑन द ब्रिंक ऑफ प्रोनाउन्सड ग्लोबल वॉर्मिग’ – त्याच वेळी ग्लोबल वॉर्मिग ही संज्ञा प्रथम वापरली गेली. १९७० मध्ये त्यांनी सांगितले की, सध्या पृथ्वी शीतचक्रातून जात आहे. पण आणखी काही वर्षांत पृथ्वीचे तापमान वाढणार आहे, त्यांचे ते भाकीत खरे ठरले. १९७६ मध्ये पृथ्वीचे तापमान वाढले, त्याचे महत्त्व ओळखून हरितगृह वायूंचे प्रमाण मर्यादित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. माणसाला सर्व गोष्टी जमतील पण कार्बन डायऑक्साइडचे नियंत्रण जमणार नाही असे त्यांचे मत होते. त्यासाठी तांत्रिक उपायच शोधावा लागेल, जसे आपण पाणी स्वच्छ ठेवायचे शिकलो तसे हवा स्वच्छ ठेवायलाही शिकले पाहिजे हे त्यांनी पहिल्यांदा सांगितले. कार्बनवर कर लावला पाहिजे त्यातूनच हे साध्य होईल असेही त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. तापमान जर ३.५ अंश सेल्सियसने वाढले तर ध्रुवीय प्रदेशातील सर्व बर्फ वितळून सागरी पातळीही वाढण्याचा धोका त्यांनी वर्तवला होता.

शिकागो येथे त्यांचे बालपण गेले, भूगर्भशास्त्रातील पदवीनंतर ते कोलंबिया विद्यापीठात संशोधन करीत राहिले. लॅमॉँट डोहेर्थी अर्थ ऑब्झर्वेटरीत त्यांचे वैज्ञानिक उपकरणांशी जडलेले नाते कायम राहिले. लेखनपंगुत्वामुळे (डिसलेक्सिया) ते संगणकही वापरू शकत नव्हते. कागद-पेन्सिल घेऊन ते काम करीत. त्यांनी लिहिलेले शोधनिबंध कर्मचाऱ्यांना पुन्हा टंकलिखित करावे लागत. एकूण ५०० शोधनिबंध व १७ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. बिल क्लिंटन यांच्या काळात त्यांना अध्यक्षांचे विज्ञान पदक मिळाले होते. ‘माझ्या स्मारकावर ग्लोबल वॉर्मिग असे शब्द लिहू नका’, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या इच्छेप्रमाणे दहन विधीनंतर त्यांची रक्षा सागरात विसर्जित होते आहे.

First Published on February 28, 2019 12:06 am

Web Title: dr wallace broecker