12 August 2020

News Flash

जोगिंदर सिंग सैनी

देशाला अनेक महान धावपटू देणारे प्रशिक्षक अशी जोगिंदर सिंग यांची ख्याती होती.  

भारतातील प्रत्येक अ‍ॅथलेटिक्सपटूने यशाच्या शिखरापर्यंत पोहोचावे, यासाठी नेहमी प्रयत्न करणारे आणि ‘‘भारतीय अ‍ॅथलेटिक्सविषयी इतकी तळमळ असलेला प्रशिक्षक मी आजपर्यंत पाहिलेला नाही,’’ अशी आदरांजली महान धावपटू पी. टी. उषा यांनी ज्यांना वाहिली, ते जोगिंदर सिंग सैनी दोन दिवसांपूर्वी काळाच्या पडद्याआड गेले. देशाला अनेक महान धावपटू देणारे प्रशिक्षक अशी जोगिंदर सिंग यांची ख्याती होती.

पंजाबच्या होशियारपूर तालुक्यात १ जानेवारी १९३० रोजी जन्मलेल्या जोगिंदर यांनी उमेदीच्या वयात अडथळा शर्यतीत राज्याचे आणि नंतर देशाचे प्रतिनिधित्व केले. पण आपली कारकीर्द फार काळ नाही, हे लक्षात आल्यानंतर जोगिंदर प्रशिक्षणाकडे वळले. विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतरही त्यांचा जीव नोकरीत फारसा रमलाच नाही. ते दिवसाचे २४ तास मैदानावरच रमले. १९५४ साली प्रशिक्षणाला सुरुवात करताना त्यांनी प्रथम शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि नंतर एनआयएस पतियाळा येथे क्रीडा प्रशिक्षणाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. १९७० ते ९० पर्यंत त्यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. यादरम्यान त्यांनी अनेक धावपटूंना घडवले. परदेशी दौऱ्यावर एखाद्या पालकाप्रमाणेच महिला खेळाडूंची काळजी घेत कामगिरी खालावल्यानंतरही ते सर्वाना धीर देत. १९७८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आठ सुवर्णपदकांसह एकूण १८ पदके पटकावणाऱ्या भारताच्या अ‍ॅथलेटिक्स संघाचे ते मुख्य प्रशिक्षक होते. १९९७ मध्ये त्यांना अ‍ॅथलेटिक्स खेळातील योगदानाबद्दल प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले. १९८८च्या सोल ऑलिम्पिकमधील खराब कामगिरीनंतर पी. टी. उषाच्या मनात निवृत्तीचे विचार घोळत होते, पण जोगिंदर यांच्या मार्गदर्शनामुळे नवी दिल्ली येथील आशियाई मैदानी स्पर्धेत तिने जोमाने पुनरागमन करून, चार सुवर्ण आणि दोन रौप्यपदकांसह टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. पण त्यानंतर मात्र तिने निवृत्ती पत्करण्याचे ठरवले. पण जोगिंदर यांनी तिला ‘ट्रॅक’वर राहण्यास भाग पाडले. अखेर १९९०च्या बीजिंग आशियाई स्पर्धेत उषाने तीन रौप्यपदकांची कमाई केली. १९६२च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे गुरबचन सिंग रंधावा तसेच महान मॅरेथॉनपटू शिवनाथ सिंग यांच्यासह अनेक खेळाडूंनी जोगिंदर यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचे नाव उज्ज्वल केले. अ‍ॅथलेटिक्स क्षेत्रात ‘सैनी साब’ म्हणून ओळखले जाणारे जोगिंदर सिंग हे २००४ पर्यंत प्रशिक्षणात कार्यरत होते. नंतर त्यांनी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे सल्लागार म्हणूनही भूमिका बजावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2020 1:56 am

Web Title: dronacharya awardee athletics coach joginder singh saini profile
Next Stories
1 फ्रीमन डायसन
2 जॅक वेल्श
3 बलबीर सिंग कुल्लर
Just Now!
X