मराठवाडय़ात २०१२मध्ये जेव्हा धरणांमधले पाणी संपले तेव्हा त्यातील गाळ काढण्याची मोहीम सुरू झाली. गाळ काढून शेतकऱ्यांनी तो फुकट घेऊन जावा, अशी योजना सुरू झाली. त्याचे मोठे कौतुकही झाले. अशा काळात ‘गाळ घेऊन जाणारे शेतकरी श्रीमंत आहेत. ज्यांना खरे तर उत्पन्नवाढीची गरज आहे त्यांना तो लाभ मिळतच नाही,’ अशी मांडणी करून गाळ सर्वसामान्य शेतकऱ्यांना नेता यावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये जर कोणाचे नाव घ्यायचे, तर त्यात डॉ. द्वारकादास लोहिया यांना अग्रक्रम द्यायला हवा. सातत्याने ‘नाही रे’ वर्गाची बाजू मांडताना आपला सूर आक्रस्ताळी होणार नाही, याची जाणीव असणारा कार्यकर्ता अशी डॉ. लोहिया यांची ओळख त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहिली. याचे कारण त्यांच्यावरीले राष्ट्र सेवा दलाचे संस्कार.

लहानपणापासून राष्ट्र सेवा दलातून समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार करणारे द्वारकादास लोहिया यांनी मराठवाडय़ाच्या विकासात कृतिशील योगदान दिले. ‘मानवलोक’ या संस्थेमार्फत त्यांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामात स्वत:ला झोकून दिले. खरे तर व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या द्वारकादास यांनी पुणे येथील साने गुरुजी रुग्णालयातही सेवा केली होती. पण पुढे मराठवाडय़ातील आरोग्य सेवेची गरज लक्षात घेऊन ते गावी आले. तत्पूर्वी बाबा आढाव आणि दादा गुजर यांच्याशी संपर्क आल्याने ते खऱ्या अर्थाने कार्यकर्ते बनले. राष्ट्र सेवा दलामध्ये त्यांचा कलापथकाच्या कामात अधिक ओढा होता. गावी आल्यावरही त्यांनी लोकशिक्षणासाठी मोठे काम केले. पुढे राजकारणातही उतरले. नगराध्यक्षपदाची निवडणूकही लढवली. यश आले नाही. मात्र, सर्वसामान्य माणसाच्या हिताचा मुद्दा पुढे आला की त्यासाठी सातत्याने लढा देत. ‘मिसा’बंदी म्हणून त्यांना अटकही झाली होती. या काळात आपण उभे करत असलेले काम मागे पडेल, असे त्यांना सातत्याने वाटे. या काळात ते खूप खिन्न असत. पुढे त्यांनी शेती विकासासाठी अनेक प्रयोग केले. विशेषत: पाणलोट हेच मराठवाडय़ाच्या विकासाचे खरे सूत्र असल्याचे त्यांना कळाले होते. त्यामुळेच साखळी बंधारे (चेकडॅम) उभारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न मार्गदर्शक ठरले. दांडगा लोकसंपर्क, सौम्य आणि आपलेसे करून घेणारी भाषा हे द्वारकादास लोहिया यांचे वैशिष्टय़ होते.

कोणत्याही मुद्दय़ावर सहमती घेत काम पुढे नेण्याकडे त्यांचा कल असे. भूकंपानंतर काही गावांत त्यांनी बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी खासे प्रयत्न केले होते. लातूर जिल्ह्यात नाबार्ड व अन्य एका संस्थेच्या मदतीने त्यांनी तेलाची गिरणीही काढली होती. शेती समस्येची जाणीव असणाऱ्या कार्यकर्त्यांला म्हणूनच ‘बाबूजी’ अशी हाक मारून समस्या सांगणाऱ्यांची संख्या खूप अधिक होती.