News Flash

प्रा. ई. सी. जॉर्ज सुदर्शन

नोबेल पारितोषिकासाठी किमान सहा वेळा शिफारस होऊनही तो मान पुंजभौतिकीत संशोधन करणाऱ्या एका भारतीय वैज्ञानिकास हुलकावणी देऊन गेला. ज्या विषयात त्यांचे मूळ काम होते त्यावर

प्रा. ई. सी. जॉर्ज सुदर्शन

नोबेल पारितोषिकासाठी किमान सहा वेळा शिफारस होऊनही तो मान पुंजभौतिकीत संशोधन करणाऱ्या एका भारतीय वैज्ञानिकास हुलकावणी देऊन गेला. ज्या विषयात त्यांचे मूळ काम होते त्यावर आणखी संशोधन करणाऱ्यांना तो मिळाला, पण त्यांना तो न देऊन नोबेल समितीने त्यांच्यावर पर्यायाने भारतावर अन्याय केला होता. त्यांचे नाव प्रा. ई. सी. जॉर्ज सुदर्शन. त्यांचे नुकतेच अमेरिकेतील टेक्सास येथे निधन झाले. सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ म्हणून ते सर्वाना परिचित होते. क्वांटम झेनो परिणाम नावाच्या विषयात त्यांचे संशोधन होते.

सुदर्शन हे टेक्सास विद्यापीठात चाळीस वर्षे प्राध्यापक होते. त्यांचा जन्म केरळातील कोट्टायम जिल्हय़ात पल्लम येथे १९३१ मध्ये झाला. तेथील सीएमएस कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतले. मद्रास विद्यापीठातून मास्टर्स पदवी घेऊन त्यांनी काही काळ होमी भाभा यांच्या समवेत टाटा मूलभूत संशोधन संस्थेत काम केले होते. १९५८ मध्ये रॉचेस्टर विद्यापीठातून त्यांनी पीएचडी केली. नंतर अमेरिकन नोबेल विजेते सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियन श्वेविंगर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची त्यांना संधी मिळाली. २००५ मध्ये नोबेल पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती, पण सुदर्शन-ग्लॉबर सादरीकरण करणाऱ्या रॉय जे ग्लॉबर यांना नोबेल देण्यात आले, पण सुदर्शन यांना मात्र ते मिळाले नाही. प्रकाशीय सुसंगततेचा पुंज सिद्धान्त त्यांनी मांडला होता. सुदर्शन यांना नोबेल न दिल्याने त्या वेळी नोबेल समितीवर टीका झाली, पण तीनपेक्षा जास्त व्यक्तींना एका वेळी नोबेल देता येत नाही असे स्पष्टीकरण समितीने केले. सुदर्शन यांचे कणभौतिकीतील व्ही-ए थिअरीतही संशोधन होते, पण त्यातही नंतर हे संशोधन रिचर्ड फेनमन व मरे गेल मान यांनी पुढे नेले व त्यांना नोबेल मिळाले. सुदर्शन यांच्यासह इतर तीन वैज्ञानिकांनी टॅकिऑन या कणाची संकल्पना मांडली होती. दरम्यान, २००७ मध्ये त्यांना पद्मविभूषण किताब दिला. डिरॅक पदक त्यांना २०१० मध्ये मिळाले होते. सी. व्ही. रामन पुरस्कार, बोस पदक, केरळ सरकारचा विज्ञान-तंत्रज्ञान पुरस्कार असे मानसन्मान त्यांना मिळाले. सुपरल्युमिनस कणांच्या बाबतीत आइनस्टाइनने मांडलेला सिद्धान्त चुकीचा असल्याचे सुदर्शन यांनी म्हटले होते. त्यांनी रॉचेस्टर विद्यापीठ, सायराक्युज विद्यापीठ, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथमेटिकल सायन्सेस या संस्थांमध्ये त्यांनी काम केले. अमेरिकन फिजिकल सोसायटीचे ते फेलो होते. डॉ. सुदर्शन हे जागतिक दर्जाचे भौतिकशास्त्रज्ञ होते, पण त्यांना नोबेल मिळू शकले नाही ही खंत सर्वाच्याच मनात कायम राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 4:13 am

Web Title: e c george sudarshan who did pioneering work in physics
Next Stories
1 टॉम वूल्फ
2 जिव्या सोमा मशे
3 डॉ. जोआन कोरी
Just Now!
X