News Flash

डॉ. द. रा. पेंडसे

टाटा समूहातून निवृत्त झाल्यानंतर डॉ. पेंडसे यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर अनेक वर्षे काम केले.

तब्बल २० वर्षे टाटा उद्योगसमूहाचे आणि पूर्णवेळ मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम केलेले डॉ. द. रा. पेंडसे यांनी भारताच्या अर्थविश्वाचे सध्या दिसणारे चित्र किती तरी वर्षांपूर्वी द्रष्टेपणाने रंगविले होते. खासगीकरण, जागतिकीकरण आणि उदारवादी व्यापाराची भाषा त्यांनी आपल्या लेखनातून, व्याख्यानांतून कधीचीच रूढ केली होती. डॉ. पेंडसे यांच्या अर्थशास्त्राची भाषा मात्र, सहज आणि प्रत्येकास सहज आकलन होईल एवढी सोपी होती. त्यांच्या याच वैशिष्टय़ामुळे जे. आर. डी. टाटा यांचा त्यांच्यावर विशेष लोभ जडला. जे. आर. डी. टाटा, नानी पालखीवाला, सुमंत मूळगांवकर आदी अनेक दिग्गजांच्या सहवासाची आपल्या लेखनातून उभी केलेली जिवंत चित्रे हे पेंडसे यांच्या लेखणीचे वैशिष्टय़ ठरले. त्यांच्या निधनाने एक आदरणीय व्यक्तिमत्व हरपले आहे.

टाटा समूहात सामील होण्याआधी भारत सरकारच्या वित्त, व्यापार व उद्योग मंत्रालयामध्येही डॉ. पेंडसे यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलल्या. अलीकडच्या काळात खासगीरीत्या वित्तीय सल्लागार म्हणून त्यांनी अनेक संस्था, उद्योगांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळेच, डॉ. द. रा. पेंडसे यांची ‘सेंटर फॉर इकॉनॉमिक पॉलिसी अ‍ॅडव्हाइस’ ही एकखांबी संस्था या क्षेत्रात अग्रगण्य स्थानावर राहिली. टाटा समूहातून निवृत्त झाल्यानंतर डॉ. पेंडसे यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर अनेक वर्षे काम केले.

पुणे येथे ६ सप्टेंबर १९३० रोजी जन्मलेल्या डॉ. पेंडसे यांनी १९५०मध्ये पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र, संख्याशास्त्र व गणित विषयातील बी.ए. (ऑनर्स) ही पदवी संपादन केली. पुढे केम्ब्रीज विद्यापाठीतून बी.ए. (ऑनर्स) करून १९५७ मध्ये याच विद्यापीठातून त्यांनी एम. ए. केले. याच काळात, १९५२-५३ मध्ये ते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे रिसर्च फेलो होते. संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द कमालीची चमकदार व गुणवत्तापूर्ण असल्याने डॉ. पेंडसे यांच्या पायाशी अनेक शिष्यवृत्ती आणि पुरस्कारांनी अक्षरश: लोळण घेतली होती. १९५४ मध्ये ते केंद्र सरकारच्या व्यापार व उद्योग मंत्रालयात उच्च पदावरील सेवेत दाखल झाले. स्टॉक एक्स्चेंज कमिशनमध्येही त्यांनी जबाबदारीचे पद भूषविले. आर्थिक क्षेत्रातील त्यांच्या असामान्य गुणवत्तेमुळे अनेक शेअर बाजार व वायदेबाजारांच्या संचालक मंडळांवर संचालक म्हणून केंद्र सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.  १९६७ मध्ये टाटा समूहात वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ म्हणून ते दाखल झाले. १९७३ ते १९९१ हा टाटा समूहातील त्यांच्या कारकीर्दीचा सुवर्णकाळ!  टाटा समूहाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करताना समूहाच्या वित्तीय व्यवहाराचा आलेख कमालीचा उंचावला.

डॉ. पेंडसे हे स्वत:च एक संस्था होते. प्रभावी वक्तृत्व, बहुरंगी लेखन आणि चतुरस्र अभ्यास या गुणांमुळे चाहत्यांचा गोतावळा त्यांच्याभोवती सतत असे. त्यांची भाषणे ऐकणे हीदेखील  एक पर्वणी होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 6:14 am

Web Title: economist dr d ra pendse
Next Stories
1 कू बोन मू
2 गिना हास्पेल
3 बालाकुमारन
Just Now!
X