28 October 2020

News Flash

एडी व्हॅन हेलन

१९७९ पासून ९०च्या दशकापर्यंत एडीच्या गिटारचा बोलबाला थांबला नाही

एडी व्हॅन हेलन

सत्तरीच्या दशकात जी बंडखोरी कलाक्षेत्रात उतरली, तिने पूर्वसुरींच्या अनुभवसंचिताला पुढे नेताना काळावर घट्ट पकड बसविणारी शैली विकसित केली. चित्रकला, सिनेमा, साहित्यातून नवप्रेरणांचे धुमारे फुलत असताना संगीतामध्ये एडी व्हॅन हेलन या इलेक्ट्रिक गिटार वादकाचे फ्रेटबोर्डवरचे अंगुलीकौशल्य जगभरच्या संगीतप्रेमींसाठी कुतूहल बनले. या वादकाचा उदय होण्याच्या काळात अमेरिकेत ‘एमटीव्ही’ नव्हता, मायकेल जॅक्सनच्या झंझावती वादळाची सुरुवातही झाली नव्हती. रॉक्सेट या स्वीडिश पॉप समूहाची रॉकशैली विकसित व्हायची होती. त्याआधी इलेक्ट्रिक गिटारच्या ‘प्लकिंग’शैलीत बदल करून तिच्यातून सुखावह स्वर छेडण्याची कलाबाजी  करीत एडी व्हॅन हेलनने लक्ष वेधले!

बी.बी. किंग, चक बेरी, जिमी हेण्ड्रिक्स आणि एरिक क्लॅप्टन या रॉक गिटार वादकांच्या पंगतीमध्ये ऐन तारुण्यात स्थानापन्न झालेल्या एडी व्हॅन हेलनने मैफलीला गिटारची झिंग चढविण्याची किमया सत्तरच्या दशकात केली. त्याने स्थापलेल्या बॅण्डचा प्रमुख गायक हेव्हिड ली रोथ असला, तरी प्रमुख आकर्षण एडी व्हॅन हेलनचा गिटाराविष्कार ठरे. लॉस एंजलिसचे क्लब गाजविणाऱ्या व्हॅन हेलन बॅण्डचे म्युझिक व्हिडीओपुढे अमेरिकेच्या मुख्य संगीतधारेचा भाग बनले. मायकेल जॅक्सन ‘किंग ऑफ पॉप’ होण्याआधीचा एक प्रसंग. त्याचा गिटार वादक अनुपस्थित असताना स्टुडिओत दाखल झालेल्या एडी व्हॅन हेलनने ध्वनिमुद्रित होत असलेल्या त्याच्या गाण्यातील नियोजित गिटारतंत्रच आपल्या शैलीने बदलून टाकले. वाजविण्याचा मोबदला वा श्रेय एडीला मिळाले नाही, पण मायकेल जॅक्सनचे ते ‘बीट इट’ गाणे अखंड लोकप्रिय ठरले. पुढे मायकेल जॅक्सनच्या अनेक गाजलेल्या लाइव्ह सोहळ्यांत एडीची इलेक्ट्रिक गिटार आणि उत्साह झळकला. अ‍ॅमस्टरडॅम शहरात १९५५ साली जन्मलेल्या एडीला जॅझप्रेमी कुटुंबातूनच वाद्यप्रेमाची दीक्षा मिळाली. १९६२ साली कुटुंबाचे हॉलंडहून अमेरिकेत स्थलांतर त्याची सांगीतिक जडणघडण उत्तम करण्यास उपयुक्त ठरले. एरिक क्लॅप्टनच्या गिटारशैलीचे अनुकरण करीत त्याने नवी शैली विकसित केली. भावासह बँड स्थापन करून लॉस एंजलिसच्या स्थानिक वर्तुळात लोकप्रियता मिळविली. इथेच एडीची गिटार हुकूमत संगीत कंपन्यांच्या नजरेत भरली. १९७९ पासून ९०च्या दशकापर्यंत एडीच्या गिटारचा बोलबाला थांबला नाही. त्याच्या गिटारची ताकद अनुभवण्यासाठी  ‘इरप्शन’, ‘पनामा’ ही गाणी खास ऐकावी लागतील. नव्वदीनंतरच्या पिढीवर गिटारगारुड करणारे अनेक कलावंत तयार झाले. त्यापैकी बहुतेकांनी एडीच्या मृत्यूनंतर आपले प्रभावस्थान एडी व्हॅन हेलन असल्याची जाहीर कबुली देत त्याला यथोचित श्रद्धांजली वाहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 12:01 am

Web Title: eddie van helen profile abn 97
Next Stories
1 कार्लटन चॅपमन
2 अनंत चरण सुक्ल
3 मारिओ मोलिना
Just Now!
X