तिरपागडेपणा, सरळ न बोलणे, इतरांपेक्षा निराळेच काही तरी करायला जाणे हे नाटय़लेखनात मात्र गुणठरलेले आहेत आणि त्या गुणांपायी अनेक पुरस्कार त्याच्या पायाशी लोळण घेताहेत, इंग्रजी नाटय़सृष्टी जगात जिथे कुठे आहे, तिथले नाटय़कर्मी त्याला नावाजताहेत.. अशी आत्तापर्यंत एडवर्ड आल्बी या व्यक्तीची गोष्ट होती. कथावास्तू म्हणू हवे तर.. किंवा नाटकाच्या भाषेत प्लॉट’.

तो त्यांच्या मृत्यूनंतरही फार बदलणार नाही; पण हल्लीच्या यशवादाला साजेसे असे एक तात्पर्यही निघेल. उदाहरणार्थ, ‘यशाकडे ढुंकूनही न पाहाता नवे, चांगले काम केलेत, तर यश तुमच्यामागे धावत येते!’   ‘कसे सांगितले’ हे लक्षातच न घेता केवळ ‘काय सांगितले’ हेच पाहणारे लोक नाही तरी कलेबद्दल अनभिज्ञच असतात, त्यांच्यासाठी हे तात्पर्य फारच उपयुक्त. बाकीच्या थोडय़ांसाठी मात्र या अमेरिकी नाटककाराने ‘चारचौघांसारखे यश’ नाकारल्यामुळेच तर न्यूयॉर्क आणि अन्यही शहरांमधील ‘ऑफ ब्रॉडवे’- बाजारशरण नसलेली गंभीर नाटके देणाऱ्या- रंगभूमीला कसा बहर आला, याचा इतिहासच मांडणारे एखादे नवे पुस्तक यापुढे निघेल. ‘हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ’ या नाटकाच्या नावातील वूल्फ म्हणजे लांडगा नव्हे आणि व्हर्जिनिया म्हणजे तंबाखू पिकवणारे राज्य नव्हे.. (आणि व्हर्जिनिया वूल्फ या लेखिकेचे हे चरित्रनाटय़ही नव्हेच!) हे त्यात सांगावे लागणार नाही.  एका बुद्धिजीवी दाम्पत्यातील अंतर्विरोध, त्यातून दोघांचीही होणारी फरपट हा आल्बीने १९६०-६१ साली लिहिलेल्या एका नाटकाचा विषय होता. त्या नाटकाखेरीज बाकीची तब्बल ३० नाटके त्याने लिहिली, रंगमंचावर आणली. त्यापैकी ‘अ डेलिकेट बॅलन्स’ (१९६७), सीस्केप (१९७५) आणि ‘थ्री टॉल विमेन’ (१९९४) या नाटकांना, नाटय़लेखनासाठी ‘पुलित्झर पारितोषिक’देखील मिळाले.. ‘मी, मायसेल्फ अँड आय’ हे २००७ साली लिहिलेले नाटक ‘अ‍ॅब्सर्ड’ नाटय़ परंपरेशी नाते सांगणारे असूनही २००८ मध्ये रंगमंचावर आले आणि नावाजले गेले..  पण तरीही जगभर याची ओळख ‘हू इज अफ्रेड..’चा – म्हणजे १९६०-६१ सालच्या त्या नाटकाचा कर्ता, अशीच! हे असे का व्हावे?

पुढे या नाटकावर चित्रपट निघाला, तोही चालला, हेही मोठेच कारण. त्याहीपेक्षा नवराबायकोच्या नात्याबद्दलच्या नाटकात एडवर्ड आल्बी यांनी त्या दोघाही पात्रांच्या तोंडून आरपार समकालीन तत्त्वचिंतन वदवले.  प्रेक्षकांना बौद्धिक आवाहन करण्यावर भर देणारा हा नाटककार पोरवयात मात्र, चारदा चार शिक्षणसंस्थांमधून घरी पाठवला गेला होता. त्या कुठल्या, हे आता इतके बिनमहत्त्वाचे ठरले आहे की विकिपीडियाखेरीज कोणीही ती माहिती आता देत नाही.

..तसेच कदाचित; जन्म १२ मार्च १९२८, मृत्यू १६ सप्टेंबर २०१६ असल्या नोंदींऐवजी किंवा आल्बींचीच नाटके चालत राहण्याऐवजी जर कलेचा बौद्धिक आस्वाद घेणाऱ्यांची संख्या वाढली, तर ती एडवर्ड आल्बींना खरी आदरांजली ठरेल.